याचसाठी केला होता अट्टाहास…खासदार डॉ अमोल कोल्हे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ जुलै २०२२

पुणे


कर्नाटकातील होदिगेरे येथील स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले साहेबांच्या समाधीस्थळी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला १८ फेब्रुवारी २०२२ रोजी भेट दिली व समाधीची दुरवस्था पाहून मन सुन्न झालं! त्यानंतर मी तात्काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्याशी फोनवर संपर्क साधून या समाधीस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली व तसे पत्रही तिथूनच त्यांना लिहिले! आज हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय की, स्वराज्य संकल्पनेचे जनक आणि छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान असलेल्या शहाजीराजेंच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारने १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री मा. बसवराज बोम्मईजी यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. याबद्दल बसवराज बोम्मई व कर्नाटक सरकारचे मी मनापासून आभार मानतो.

कर्नाटक सरकारचे आभार

या गोष्टीचा मला इतका आनंद झालाय की त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. कर्नाटक सरकारने असंख्य शिवभक्त व शंभुभक्तांसह माझ्याही मागणीला दिलेल्या या सकारात्मक व कृतिशील प्रतिसादाबद्दल मी कर्नाटक सरकारचा सर्व शिवभक्तांच्या वतीने अगदी हृदयापासून आभारी आहे. यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वांचेच याबद्दल अभिनंदन! छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणारे व त्यांच्या मनात स्वराज्य संकल्पनेची रुजवात करणारे शहाजीराजे साहेब यांचे हे समाधीस्थळ हे माझ्यासारख्या असंख्य शिवभक्तांसाठी, शिवरायांच्या मावळ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. त्या समाधीस्थळाच्या विकासासाठी आपण आरंभलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश सुखद आहे.

शिंदे सरकारनेही सक्रिय हातभार लावावा

कर्नाटक सरकारने घेतलेल्या या सकारात्मक पुढाकाराला आताच्या महाराष्ट्र सरकारने देखील सक्रिय हातभार लावावा, अशी विनंती मी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना करतो. किंबहुना शिवरायांच्या संस्कारांचे, विचारांचे पाईक म्हणून आपणा सर्वांचेच ते परमकर्तव्य आहे. शहाजीराजेंच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार प्रत्यक्षात येऊन त्यांना उचित सन्मान मिळेपर्यंत माझा पाठपुरावा नेटाने सुरुच राहील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *