तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे काम रखडल्याने खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची खंत

रामदास सांगळे
विभागीय संपादक
११ जुलै २०२२


तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी खासदार झाल्यापासून पाठपुरावा केला परंतु या कामाला मुहूर्त केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.नुकतंच खासदार कोल्हे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून याबाबतची खंत व्यक्त केली आहे.


गतवर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या उपलब्ध लांबीत रुंदीकरण करण्यासाठी १०१५ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानुसार २०२१ मध्ये काम सुरु होणे अपेक्षित होते. परंतु त्याचवेळी अचानक या रस्त्याच्या चौपदरीकरणासह एलिव्हेटेड रस्ता बांधण्याची घोषणा गडकरी यांनी केली. त्यानुसार या रस्त्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता निविदा प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित होते. परंतु या निविदा प्रक्रियेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अद्यापही मंजुरी आलेली नाही. याकडे खासदार कोल्हे यांनी पत्र लिहून गडकरी साहेबांचे लक्ष वेधले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या काहीशा धरसोडीमुळे रस्त्याचे काम लांबत चालले आहे, ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे. आता तर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हा रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे. कधी चौपदरीकरण, तर कधी भूसंपादनात अडचणी असल्यामुळे ‘ताब्यात असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण’ असे बदल केल्याने तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भूसंपादन ही अतिशय क्लिष्ट बाब बनली आहे. त्यातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एलिव्हेटेड रस्त्याचा प्रस्ताव मांडलाय. या धरसोड वृत्तीमुळे रस्त्याचे काम लांबत चालले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिकांना आणि कामगार वर्गाला वाहतुकीदरम्यान प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चाकण एमआयडीसीत वाहन उद्योग क्षेत्रातील शेकडो आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या कंपन्यांचे परदेशातील उच्चपदस्थ अधिकारी सातत्याने चाकण येथे येताना या रस्त्यावरुन प्रवास करतात. अशावेळी त्यांच्या मनात पायाभूत सुविधांबाबत देशाची प्रतिमा कशी तयार होत असेल, याबद्दलची चिंताही कोल्हे यांनी पत्रात नमूद केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *