गुरुकुल च्या ग्रंथ दिंडी मधून वाचनाचा संदेश

जुन्नर | प्रतिनिधी,

              सावरगाव, तालुका जुन्नर येथील गुरुकुल प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून हरिनामाचा गजर करत सावरगाव मधून पायी ग्रंथ दिंडी काढली. यावेळी मुला मुलींनी पुस्तक वाचण्याचे महत्व त्याचबरोबर स्वच्छता व पर्यावरण रक्षण आणि व्यसनमुक्ती याबाबत जनजागृती केली, अशी माहिती गुरुकुलच्या प्राचार्या सौ जयश्री शेटे यांनी दिली.

 

विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, पुंडलिक, ज्ञानदेव आणि वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा जयघोष करत शाळेतून पालखी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन व हातात टाळ पखवाज घेऊन विठू नामाचा गजर केला. या पालखी सोहळ्याचे नियोजन प्राचार्या सौ. जयश्री शेटे, शिक्षिका पूजा शेलार, रंजना भगत व समस्त ग्रामस्थ मंडळी सावरगाव यांनी केले होते. सावरगाव ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेऊन चिमुकल्यांचे कौतुक केले.