४५ मोटारसायकली व सोने लुटणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१० जून २०२२

नारायणगाव


जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशनच्या वतीने ४५ मोटारसायकली व सोने लुटीच्या मोठ्या गुन्ह्याची उकल झाली असून सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याबाबत जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी आळेफाटा येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्या विषयीची माहिती दिली.

चार सराईत आरोपींकडून २३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी जावळे म्हणाले की, आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेल्हे गावाजवळील गुंजाळवाडी येथे कल्याण नगर महामार्गावर रवीवार दिनांक २९ मे २०२२ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शांताबाई बबन पावडे (रा. पळसपुर ता. पारनेर जि.नगर) या उभ्या होत्या त्याच वेळी आरोपी प्रमोद लक्ष्मण सुरकुंडे (वय २६ रा. निघोज, तालुका पारनेर, जिल्हा नगर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे कबूल करुन त्याने चोरलेल्या सोन्याचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. आरोपी प्रमोद सुरकुंडे याच्यावर नगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये वाहन चोरीबाबत गुन्हा दाखल असल्याने त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास केला असता, त्याने त्याचे साथीदार ज्ञानेश्वर रंगनाथ बिबवे (वय २२), गणेश फक्कड कारखिले (वय २३ दोघेही रा. निघोज तालुका पारनेर) व आदिल मुख्तार अहमद कुरेशी (वय २१, सध्या रा. निघोज, मूळ राहणार बनकटवा तालुका उतरौला, जिल्हा बलरामपुर, उत्तर प्रदेश) यांच्या मदतीने अनेक मोटरसायकली चोऱ्या केल्याबाबत माहिती मिळाली.


या आरोपींना निघोज येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी आळेफाटा, नारायणगाव, ओतूर, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, हिंगोली, औरंगाबाद, नाशिक या भागातून मोटारसायकल चोरी केल्याबाबत सांगितले. त्यांना अटक करून त्यांच्याकडे वाहन चोरीबाबत तपास केला असता एकूण ४५ मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असून त्यामध्ये आळेफाटा, नारायणगाव ओतूर, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी, चंदन नगर, पुणे बंडगार्डन, फरासखाना, येरवडा, लोणीकंद, चिखली, चाकण, पारनेर, कोतवाली पोलिस स्टेशन नगर, शिर्डी, दिंडोरी, हिंगोली, रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई, एमआयडीसी पो. स्टेशन वाळूज, औरंगाबाद या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. वरील चारही आरोपींकडून २३ लाख रूपये किंमतीच्या मोटारसायकली व सोने जप्त करण्यात आले असून ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, महिला पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भीमा लोंढे, प्रकाश जढर, लहानु बांगर, अमित माळुंजे, पंकज पारखे, संजय शिंगाडे, पोपट कोकाटे, हनुमंत ढोबळे, मोहन आनंदगावकर, पोलीस मित्र प्रतिक जोरी, नामदेव पानसरे यांनी केली. या महत्त्वाच्या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय शिंगाडे करत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *