रोहित खर्गे
विभागीय संपादक
०४ जून २०२२
पिंपरी
झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन आणि हवा आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी कारणीभूत ठरते. अनेक वृक्षांमध्ये तर औषधी गुणधर्म असतात, त्यापासून विविध औषध बनवली जातात. झाडांपासून आपल्याला नवीन जीवनदान सुद्धा मिळू शकते. त्याचप्रमाणे वृक्ष हे पाऊस पडण्याचे महत्त्वाचे आणि सर्वात गरजेची भूमिका साकारत असून “वृक्ष संवर्धन” व “भूमी संवर्धन” यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी केले. एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पिंपरी चिंचवड महापालिका व पीसीएमसी स्मार्ट सिटी लिमिटेड, यांच्या सहकार्याने “इंसिग्नीया” या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली. त्यावेळी,विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. पाचपांडे बोलत होते.
एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा आंतर-महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवास सुरुवात
कार्यक्रमाप्रसंगी, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, ईशा फाउंडेशनच्या कामिनी पटेल, संचालिका एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट डॉ. आशा पाचपांडे, स्मार्ट सिटीचे जनसंपर्क अधिकारी सोयम अस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
डॉ. आशा पाचपांडे यांनी सुद्धा भूमी संवर्धन कसे करावे, याविषयी माहिती दिली. कामिनी पटेल यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व आणि इशा फाउंडेशनची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्वागत नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमास विविध नृत्यकला सादर केली. दरम्यान, रांगोळी स्पर्धा, फेस पेंटिंग स्पर्धा, मॅड अँड स्ट्रीट प्ले, सिंग ओ मेनिया (गायन स्पर्धा) फुटलुज (नृत्यस्पर्धा) आणि द बँड च्या थेट मैफिलीने कार्यक्रमाची सांगता झाली. एएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व संचालक, प्राचार्य, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम संयोजनात सहभाग घेतला.