देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीत पहिल्याच दिवशी धावले ३०० बैलगाडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२८ मे २०२२

पिंपरी


भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर राहुल जाधव आणि नितीन आप्पा काळजे यांच्या पुढाकाराने जाधववाडी चिखली येथे देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सुरू आहे. शर्यतीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३०० बैलगाडे धावले, तर घाटाचा राजा हा किताब बैलगाडा मालक पांडुरंग थोरात यांच्या बारीने पटकावला. भाजप शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे. प्रचंड प्रतिसादामुळे ही स्पर्धा आमदार लांडगे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाने एक दिवस अगोदरच २७ मे रोजी सुरू करण्यात आली.

मंचरच्या पांडुरंग थोरात यांच्या बैलगाडा बारिने पटकावला ‘ घाटाचा राजा ‘ किताब

पहिल्या दिवशी सकाळी ०६ वाजता सुरू झालेली शर्यत सायंकाळी ०६ वाजता संपली. याच दिवशी पहिल्यांदाच इतिहासात एक दिवसात तब्बल ३०० गाडे धावले आहेत. त्यापैकी २४ गाड्यांनी वरच्या फेरीत स्थान मिळवले आहे, तर पहिल्या दिवसाचा ‘ घाटाचा राजा ‘ किताब मंचर येथील पांडुरंग थोरात यांच्या बारीने ११.४४ सेकंदात घाट पार करत मिळवला. अशी माहिती आयोजकांनी दिली.


आयोजक माजी महापौर राहुल जाधव आणि माजी महापौर नितीन अप्पा काळजे यांच्या नियोजनातून भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे. जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव म्हणाले की, टोकन पद्धतीने शर्यतीचे नियोजन करण्यात आले. मात्र दोन हजारहून अधिक टोकन बूक झाल्यामुळे शर्यत नियोजित चार दिवसांऐवजी पाच दिवस घ्यावी लागली. दि. २८ मे रोजी सकाळी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

या शर्यतीला पहिल्याच दिवशी सुमारे १२ हजार बैलगाडा शौकिनांची गर्दी पाहायला मिळाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील भाजपाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, प्रसिद्घ गाडामालक उपस्थित होते. पहिल्या दिवशी एकूण ३०० गाडे धावले असून, त्यापैकी २४ गाड्यांनी फायनल फेरीमध्ये स्थान मिळवले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *