नागरिकांच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी पाण्याची टाकी उभारा न्यायालयाच्या आदेशाने भाजपचे पितळ उघडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ मे २०२२

भोसरी


भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर व राजकीय दबावातून दत्त मंदिराच्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्याचा प्रयत्न चालविला होता तो प्रयत्न न्यायालयाच्या निर्णयामुळे उघडा पडला आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करून महापालिका प्रशासनाने पाण्याच्या टाकीबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असे आदेश दिल्यामुळे भाजपाचे पितळ उघडे पडले असून नागरिकांच्या दृष्टीने योग्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत यांनी दिली आहे.

पाण्याच्या टाकीवरून न्यायालयात सुरू असलेल्या लढ्याचा निकाल आल्यानंतर संजय उदावंत यांनी एका पत्रकाद्वारे न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली आहे. उदावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत असलेल्या सत्तेच्या जोरावर भाजपाच्या काही नगरसेवकांनी केवळ श्रेय लाटण्यासाठी प्राधिकरणाच्या सेक्टर क्रमांक १ मध्ये पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय घेतला होता. ज्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्याचा प्रयत्न सुरू होता त्या ठिकाणी दत्त मंदिर असल्याने स्थानिक रहिवाशांचा त्याला विरोध होता. तसेच या ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे हे तांत्रिक दृष्ट्या चुकीचा असतानाही सत्तेच्या जोरावर सेक्टर एकमधील प्लॉट क्रमांक चार येथे ही टाकी उभारण्याचा प्रयत्न चालविला होता. प्रशासनावर राजकीय दबाव टाकून सुरू असलेल्या या प्रकाराविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे येथील रहिवाशांचा व सर्वसामान्य नागरिकांचा विजय झाला असून भाजपला चपराक बसली आहे.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर

आम्ही पाण्याच्या टाकी उभारणीतील तांत्रिक दोष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पाण्याची टाकी उभारण्याबाबत पालिकेला आदेश दिले असून त्यात म्हटले आहे की, पाण्याची टाकी कोठे उभी करावी याबाबत न्यायालय हस्तक्षेप करणार नसून त्याबाबत महापालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा. तांत्रिक बाबी, योग्य जागा, व इतर आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून नागरिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होईल, अशा कोणत्याही ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्यात यावी.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे सेक्टर क्रमांक एकमध्ये भाजपने सत्तेच्या बळावर पाण्याची टाकी उभारण्याचा जो प्रयत्न चालविला होता तो हाणून पाडण्यात आम्हाला यश आले आहे. नागरिकांच्या सोयीच्या आणि तांत्रिक दोष टाळून इतर योग्य ठिकाणी पाण्याची टाकी पालिका प्रशासनाकडून उभारली जाईल, दत्त मंदिर पाडून त्याठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याचा डाव नागरिकांच्या एकजुटीने उजनीत उजनीत बुडवण्यात आला आहे, असेही उदावंत यांनी या पत्रकात म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी अत्यंत विश्वासाने सत्ता सोपविली होती. मात्र गेल्या पाच वर्षांत सत्तेचा गैरवापर करत भाजपच्या नगरसेवक नेतेमंडळींनी महापालिकेत केवळ खंडणीखोरी आणि लाचखोरी करतानाच निविदांमध्ये भ्रष्टाचार करून कोट्यवधींची माया जमविली. जनतेसमोर या मंडळींचा खरा चेहरा उघडा पउला असून पिंपरी-चिंचवडची सुज्ञ जनता भाजपला येत्या महापालिका निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही संजय उदावंत यांनी भाजपला लगावला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *