मातंग समाजाच्या मनेश आव्हाड या तरुणाला जिवंत मारणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन : लहुजी शक्ती सेना, शिरूर ची मागणी

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
२६ एप्रिल २०२२

शिरूर


औरंगाबाद येथील मनेश शेषराव आव्हाड, या सत्तावीस वर्षीय तरुणास तेथिलच काही तरुणांनी लाकडी दांडके व रॉडच्या साहाय्याने बेदम मारहाण केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडिया मधून जोरदार फिरत आहे. या तरुणांनी केवळ मनेश आव्हाड या तरुणाला मारलेच नाही, तर त्याचा व्हिडिओ देखील काढून तो सोशल मीडिया वर टाकला. दुर्दैवाने मनेश आव्हाडचा, या गंभीर मारहाणीत मृत्यू झाला. या अमानुष कृत्याचा सर्वत्रच मातंग समाज निषेध करत असून, अनेक नेते मंडळी व संघटनांनी मनेश आव्हाड राहत असलेल्या औरंगाबाद शहरातील, मेधावाले सभागृह, N – 12, हुडको, येथे समक्ष त्याच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेना, शिरूर, जी. पुणे, यांनीही या अमानुष मारहाणीच्या घटनेचा निषेध करत, शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलेय. त्यात असे म्हटले आहे की, “हे अमानुष कृत्य करणाऱ्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.” असा इशारा या निवेदनात दिलेला आहे. यावेळी ग्रहविभागाला दिलेल्या या निवेदनाचा स्वीकार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केला. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस आदिक ओव्हाळ, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मोनिका जाधव, शहाराध्यक्ष विशाल जोगदंड, तालुका युवक कार्याध्यक्ष नागेष साळवे, शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष नानू भवाळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *