पिंपरी-चिंचवडमधील रेल्वेलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करा : आमदार महेश लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२० एप्रिल २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवडमध्ये रेल्वे ट्रॅकलगतच्या जागेतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे घरे हटवण्यात येणार आहेत. तशा सूचना रेल्व प्रशासनाने दिल्या आहेत. संबंधित नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे राज्य शासनाने संबंधित झोपडपट्टीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना मागणी

याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे विभागाच्या हद्दीतील झोपडपट्यांबाबत दिलेल्या निकालाचा चुकीचा अन्वयार्थ लावून पिंपरी-चिंचवडमधील रेल्वेलगतच्या झोपडपट्टीधारकांना १५ दिवसांत घरे रिकामी करण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड स्टेशन येथील साईबाबानगर, आनंदनगर, कासारवाडी, पिंपरी, दापोडी, दळवीनगर आदी भागात रेल्वेच्या जमिनीवर नागरिकांच्या झोपड्या अनेक वर्षांपासून आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने या झोपड्या हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ४० ते ४५ हजार नागरिक यामुळे बेघर होणार आहेत. सदर जमीन रेल्वे विभाग अंतर्गत येत असून, त्यावर हजारो झोपडपट्टीवासीय राहत असून सदर जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रेल्वे विभागाने नोटीस बजावली आहे. त्यानुसर पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणतीही भूमिका किंवा कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे संबंधित नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घ्या…

वास्तविक, रेल्वे ट्रॅकशेजारी राहणारे नागरिक आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आहेत. मोलमजुरी किंवा घरकाम करुन उदरनिर्वाह करणाऱ्या रहिवशांची संख्या जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वे प्रशासन पुनर्वसनाबाबत कार्यवाही करणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्य सरकाने रेल्वे ट्रॅकशेजारील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घ्यावी. तसेच, रेल्वे ट्रॅकशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *