महापुरुषांचे कार्य माता, माती आणि मातृभूमी साठी सर्वोच्च – डॉ अमोल कोल्हे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१६ एप्रिल २०२२ 

नारायणगाव


“महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाती धर्म , भाषा-संस्कृती अशा वैविध्यपूर्ण असणाऱ्या या भारत देशाला संविधानाच्या माध्यमातून एकसंध बांधून ठेवले आहे.डॉ.आंबेडकरांचे कार्य हे संपूर्ण देशाच्या हितासाठी आहे. तसेच भारतात जन्माला आलेल्या सर्व महापुरुषांचे कार्य माता माती आणि मातृभूमीसाठी सर्वोच्च असेच आहे” असे प्रतिपादन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर तालुका नारायणगाव येथे आयोजित केलेल्या युगप्रवर्तकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून शिरूरचे खासद डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.यावेळीआमदार अतुल बेनके , माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे , तहसीलदार रविंद्र सबनीस ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बिंबाजी वाव्हळ , उपाध्यक्ष राजेंद्र रणदिवे महेश शेळके, आरिफ आतार , संतोष दांगट , रमेश हांडे , सूरज वाजगे , किरण वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानकडून युगप्रवर्तकांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन

खासदार डॉ.कोल्हे यावेळी म्हणाले की , “कोणत्याही युगप्रवर्तकाने कोणत्याही एकाच जातीसाठी , समाजासाठी किंवा धर्मासाठी कार्य केले नव्हते किंवा ठराविक घटकासाठी त्यांचे कार्य सीमित नव्हते.या महापुरुषांनी माती , माता आणि मातृभूमी या तीन गोष्टींना सर्वोच्च मानले आणि आपलं कार्य एवढं मोठं उभं केलं की त्याच्यासमोर जाती , समाजाच्या आणि धर्माच्या भिंती खुज्या ठरतील.आपण प्रत्येक महापुरुषाला धर्माची चौकट घातली आणि नंतर त्यांच्या गळ्यात जातीचा हार घातला.आपण प्रत्येक महापुरुषाला एका जातीत आणि धर्मात सिमीत करण्याचा प्रयत्न करतो ही दुर्दैवी बाब आहे.द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जागतिक अर्थातज्ज्ञांच्या तोडीचा ग्रंथ लिहून त्या ग्रंथाच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ज्ञ देखील होते ,भाकरा नांगल धरणाची संकल्पना ही डॉ. आंबेडकरांची आहे.”

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.शिवाजी सोनवणे यांनी केले.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पाली भाषा अभ्यासक अतुल मुरलीधर भोसेकर , जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित भीमराव जोंधळे , शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप प्रल्हाद जोशी ,नारायणगावचे सरपंच योगेश नामदेव पाटे ,खोडदचे माजी सरपंच जालिंदर दत्तात्रय डोंगरे ,आदर्श शिक्षक संजय अर्जुन रणदिवे , सामाजिक कार्यकर्ते सचिन बबन भोजणे ,विवेकानंद हरी कडलाक , भटकंती ट्रेकर्स ग्रुप यांना ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

“नारायणगाव येथील शासकीय विश्रामगृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळी दरम्यान २३ व २४ मे १९३१ रोजी मुक्काम केला होता.या वास्तूला विशेष महत्व आहे.या ठिकाणी उत्कृष्ट प्रकारचे स्मारक करण्यासाठी खासदार डॉ.कोल्हे व आमदार या नात्याने मी पाठपुरावा करत आहोत.”
– अतुल बेनके , आमदार , जुन्नर


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *