आनंदी व प्रसन्न राहण्यासाठी सकारात्मक विचारांची गरज – योगिता अडसरे(मानसशास्त्रज्ञ)

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०९ एप्रिल २०२२

नारायणगाव


स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या या जगात नेहमी अव्वल आणि आनंदी राहण्यासाठी तसेच निरोगी व प्रसन्न राहण्यासाठी सकारात्मक विचारांबरोबरच मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच मानवाची प्रगती सर्व स्तरावर उत्तम प्रकारे होईल असे विचार लेखिका व मानसशास्त्रज्ञ योगिता अडसरे यांनी मांडले आहे.

जीवन जगण्याची कला कशी आत्मसात करावी व आपल्या आयुष्याचा आनंद आपणच कसा घ्यावा याविषयी योगिता अडसरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मानवाला निसर्गाने विचार करण्याची देणगी बहाल केली आहे. त्या विचारांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. मानसशास्रानुसार अंदाजे प्रत्येक व्यक्ती ही एका दिवसामध्ये साठ हजार विचार करते. व्यक्ती सकाळी उठल्यापासून ते रात्री गाढ झोपेपर्यंत विचारच करीत असते. एखाद्या वस्तूकडे व्यक्तीकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे यांवर आपले विचार, उच्चार व आचार अवलंबून असतात. चांगले विचार केले तर व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचेल म्हणजेच चांगल्या विचारांचा आपल्या आरोग्यावर व मनावर देखील चांगलाच परिणाम होतो. सकारात्मक विचारांचा व आपल्या आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. जसे की, सतत ताजेतवाने वाटणे, नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळणे, नेहमी आनंदी व उत्साही वाटणे कुठलेही कार्य मनापासून करणे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधणे हे सर्व आपल्या विचारांच्या दिशा कशा आहेत यांवर अवलंबून असते.

मानसिक आरोग्य उत्तम असेल तरच सर्वांगीण प्रगती होते – योगिता अडसरे

सकारात्मक विचार हे आयुष्य जगायला शिकविते आलेल्या संधीचे सोने कसे करावे तसेच समाधानी आयुष्य कसे जगावे हेही शिकविते. कधी कधी संकटेही संधीच्या स्वरुपात येतात व आपण त्यातून अलगद मार्ग काढतो ते केवळ सकारात्मक विचारांमुळेच. उदा. एखाद्या व्यक्तीची भूक भागण्यासाठी त्यांना अर्धी भाकरी व मिरची पण पुरेशी आहे पण पंचपक्वाने खाणारा कितपत समाधानी असेल हे सांगणे कठीण आहे. तसेच झोपडीमध्येही अनेक लोक आनंदाने आपले जीवन जगतात. जे लोक रात्री जमिनीवर पडल्यापडल्या लगेच झोपी जातात ते खरे समाधानी. नाहीतर झोपेच्या गोळ्या घेऊन देखील काही व्यक्तींना चांगली झोप लागत नाही. सध्या झटपट श्रीमंतीचा रोग समाजाला लागलेला आपल्याला दिसतो. यामुळे आपण आपले मानसिक स्वास्थ्य हरवून तर बसलोच आहे, परंतु हव्यासापोटी व अपेक्षित घटना न घडल्याने डिप्रेशन (ताणतणाव) मध्ये जाण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यातूनच आत्महत्येसारखा विखारी विचार काहींच्या मनात घोंगावतो.

आज आपण समाजात पाहतो की, खूप व्यक्तींकडे सर्व सुखसोयी आहेत, सुविधा आहेत पण मानसिक समाधान मात्र नाही, याचे ही कारण हेच की त्यांचा दृष्टीकोन ! कितीही पैसा आपल्याजवळ असला तरी आपण बाजारातून समाधान किंवा आनंद विकत आणू शकत नाही. तो आपल्या स्वभावात असायला हवा. आपल्याकडे जे आहे, जसे आहे ते स्वीकारून आयुष्य आनंदी ठेवणे म्हणजेच समाधानी आयुष्य जगणे होय. विनाकारण मृगजळाच्या पाठीमागे धावत राहणे याला काहीच अर्थ नाही. त्यासाठी आपला सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचा आहे. म्हणूनच नेहमी आनंदी राहा. जर नेहमी आनंदी राहिलात तर सर्व जग आपलेच आहे. नाहीतर आपले डोळेही आपल्या अश्रुना थारा देत नाहीत. हेही तितकेच सत्य आहे.

आपण नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहावे. घरामध्ये असताना कामाच्या ठिकाणचा विषय न घेता कुटुंबासमवेत वेळ घालवावा त्यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल. आपले मन खंबीर असायला हवे. आपल्याला ताण-तणावापासून दूर राहता आले पाहिजे. वेळेचे अचूक नियोजन व कामाचे नियोजन करता यायला हवे. नवनवीन ज्ञान आत्मसात करता यायला हवे. चांगल्या पुस्तकाचे वाचन, ध्यान-धारणा करणे यांमुळे आपण प्रसन्न राहतो व आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच शारीरिक व मानासिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी सतत सकारात्मक विचारांचा विचार करणे गरजेचे आहे. थोडक्यात काय तर आपण नेहमी सकारात्मक विचार करून आपण आपले मन प्रसन्न व आनंदी ठेवले पाहिजे. त्यातूनच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. व जीवनाचा आनंद द्विगुणित होईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *