शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला, हल्लेखोर आणि सुत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करा; गृहमंत्री वळसे पाटलांच्या पोलिसांना सूचना

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी
०९ एप्रिल २०२२

मुंबई 


दि. ०८ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार अतिशय चिंताजनक आहे. तपास यंत्रणा कुठे अपयशी ठरली हे तपास करून पाहीले जाईल. यासंदर्भात पोलिस आयुक्त व सह पोलिस आयुक्तांना सूचनाही दिल्या आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर न्यायालयाने काल निर्णय दिला आहे. या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असताना दुसऱ्याच दिवशी अशाप्रकारचा हल्ला करणे, हे ठरवून केले असल्याची शंका वाटते. यामागे कोणी अज्ञात शक्ती असल्याशिवाय अशा प्रकारची घटना घडणार नाही, अशी आशंका गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिलपूर्वी कामावर हजर व्हावे. कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. त्यानंतरही काही प्रश्न शिल्लक राहिले असतील तर त्याबाबत संबंधित मंत्री चर्चा करून मार्ग नक्कीच काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रक्षोभक विधाने करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न – दिलीपराव वळसे पाटील, गृहमंत्री

प्रक्षोभक विधाने करून समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे गृहमंत्री म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या किंवा इतर प्रश्नांच्या आडून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यातील काही राजकीय पक्ष व शक्ती करत आहेत.त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आमचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब यांच्या घराबाहेर काही अज्ञात शक्तींच्या माध्यमातून हा गैरप्रकार करण्यात आला. त्याचा गृह विभाग निश्चितच तपास करेल.

आज दि. ०९ एप्रिल रोजी सकाळीच गृहविभागाची क्राईम कॉन्फरन्स होती. अशा घटना राज्यात घडणे हे बरोबर नाही. तपास यंत्रणा याची माहिती मिळवण्यासाठी कुठे कमी पडली याची चौकशी निश्चितच केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत असते. मात्र आजच्या आंदोलनात आलेल्या जमावाने महिलांना पुढे केले. यातून तेथील उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना हा जमाव थोपवता आला नसावा. या घटनेविषयी मी स्वत: सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला. तसेच याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून यावर लक्ष ठेवले होते. आता सिल्व्हर ओक येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांविषयी न्यायालयीन प्रक्रिया जवळपास संपलेली आहे. न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे याविषयीचा तपशील न्यायालयासमोर ठेवण्यासाठी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन पुढे या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, असे गृहमंत्री म्हणाले.

हल्याचा प्रकार संपूर्ण चुकीचा असून हे कदापि सहन केले जाणार नाही – दिलीपराव वळसे पाटील, गृहमंत्री

मागील ५०-६० वर्षांमध्ये अशी घटना कुठेही घडलेली नाही. पवार साहेब सातत्याने लोकहिताचीच कामे करत आले आहेत. हा प्रकार संपूर्ण चुकीचा असून हे कदापि सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारने एसटीचे विलीनीकरण करणे शक्य नाही याची स्पष्टता केली होती. यानंतरही वेळोवेळी बैठका घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. काल न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार विलिनीकरण शक्य नाही. तरीदेखील दुसऱ्या दिवशी असे चुकीच्या पद्धतीने आंदोलन करणे हे कधीही मान्य होणारे नाही.

अशी आंदोलने करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही हे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. यामागे राजकीय हेतू आहे. राज्यात त्रिपुरावरून घडलेली घटना, मंदिरे उघडण्याबाबत घडलेल्या घटना याद्वारे हे समोर येत आहे, असे गृहमंत्री म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *