राष्ट्रवादीच्या हलगर्जीपणामुळे मोशी-इंद्रायणीनगरकरांनी नरकयातना भोगल्या !

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०८ एप्रिल २०२२

पिंपरी


शहरातील कचरा समस्या वाढवून नागरिकांना इंद्रायणीनगर, मोशी भागातील नागरिकांना न रकयातना भोगायला लावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आगीच्या घटनेचे राजकीय भांडवल करु नये. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात २० वर्षांत शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या. कोणते प्रकल्प हाती केले आणि सुरू केले, याचाही लेखाजोखा पिंपरी-चिंचवडकरांसमोर मांडावा, असे आव्हान भाजपाचे माजी महापौर नितीन काळजे यांनी दिले आहे. मोशी येथील कचरा डेपोवर बुधवारी सायंकाळी आगीची घटना घडली. महापालिका अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणली. यावर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘आग लागली की लावली?’ असा सवाल उपस्थित केला. तसेच, आगीच्या घटनेची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

भाजपाचे माजी महापौर नितीन काळजे यांचा पलटवार

यावर माजी महापौर नितीन काळजे यांनी राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेतला. काळजे म्हणाले की, आगीच्या घटनेची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भाजपा पदाधिकारी सचिन तापकीर आणि ग्रामस्थसुद्धा उपस्थित होते. कचऱ्याला लागलेल्या आगीचेसुद्धा राष्ट्रवादी राजकारण करीत आहे. १९९७ च्या सुमारास कचरा डेपोची निर्मिती झाली. त्याअगोदर याच ठिकाणी कचरा टाकला जात होता. कचऱ्याचे डोंगर उभा राहिले. मात्र, २० वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कचरा समस्या सोडवण्यासाठी एकही प्रकल्प हाती घेता आला नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी चुकीचा सल्ला देणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर भाजपाला लक्ष्य करणे आणि आंदोलनाचे इशारे व पत्रकबाजी करुन प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. आम्ही आग लागल्याच्या ठिकाणी भेट दिली. मात्र, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते तिथे फिरकले नाहीत. कचरा डेपोबाबत राष्ट्रवादीचा कळवळा केवळ बेगडी आहे.

भाजपाचे माजी महापौर नितीन काळजे

दूध का दूध…पाणी का पाणी होवूनच जावुद्या…
वास्तविक, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासक राजवट आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आगीच्या घटनेची खुशाल चौकशी करावी. दोषी असल्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर कचरा डेपोची आठवण होणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी २० वर्षांच्या सत्ताकाळात काय उजेड पाडला, याचाही लेखाजोखा पिंपरी-चिंचवडमधील जनतेसमोर मांडावा. आगाची घटना घडली असताना एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणे अपेक्षित होते. दुर्घटना घडलेली असताना केवळ प्रसिद्धी पत्रक काढून प्रसिद्धीसाठी टीका-टीपण्णी करण्यापेक्षा प्रशासनाला काय मदत लागते? हे पाहणे गरजेचे होते, असा सल्लाही नितीन काळजे यांनी दिला आहे. तसेच, निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी मुद्दा उपस्थित करुन आग लावण्याचा प्रयत्न करु नये, असेही म्हटले आहे.

कचरा समस्या सोडवण्यासाठी काय केले याचा लेखाजोखा द्या

राष्ट्रवादीकडून कचऱ्याचे केवळ भांडवल…
भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात वेस्ट टू एनर्जी, बायोगॅस निर्मिती, लिचेड ट्रिटमेंट प्लॅन्ट, ब्रिक्स निर्मिती, बायोमायनिंग असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे लवकरच कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे. बफर झोनचा प्रश्न राष्ट्रवादीने वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला. मात्र, भाजपा काळात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने बफर झोन आणि कचरा प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागले आहेत. राष्ट्रवादी नेत्यांनी केवळ कचऱ्याचे राजकारण करुन लोकांना वेठीस धरण्याची भूमिका ठेवली आहे, असेही काळजे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी, माजी आमदारांच्या अपयशाची कबुली…
राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्यास सुरूवात केली आहे. २० वर्षांत कचरा प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याची कबुली नव्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. पत्रकबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांडूनच राष्ट्रवादी आणि माजी आमदारांच्या त्ताकाळात कचरा डेपोकडे दुर्लक्ष केल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीचा पाय आणखी खोलात जाणार असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला लोकांना उत्तरे द्यावी लागतील, असे नितीन काळजे यांनी म्हटले आहे.

आगीची घटना ही निसर्गनिर्मित…
मोशी कचरा डेपोवर लागलेली आग निसर्गनिर्मित आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कचरा डेपोवरील उष्णात प्रचंड वाढलेली असते. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली मिथेन वायुची निर्मिती होते. तसेच, हवेचा दाब निर्माण झाल्यामुळे ज्वलनशील वायूचे उत्सर्जन होते. परिणामी, आगीसारखी घटना घडू शकते. तसेच, डेपोवरील कचऱ्याला वरच्या भागात आग लागली. वाऱ्यामुळे ती अधिक पसरली. मात्र, अग्निशमन विभागाच्या मदतीने आग तात्काळ नियंत्रणात आणली आहे. यापूर्वीही एकदा आग लागल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *