श्रीक्षेत्र ओझरला जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी केला बंद

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०४ एप्रिल २०२२

नारायणगाव


नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कोल्हेमळ्यातून अष्टविनायकापैकी एक असलेल्या ओझरला जाणारा रस्ता येथील बाधित शेतकऱ्यांनी रविवार दि ३ रोजी दुपारी बंद केला. याबाबत येथील शेतकऱ्यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला दि ३१ मार्च रोजी याबाबतचे निवेदन दिले होते. या निवेदनात येथील शेतकऱ्यांनी अष्टविनायक रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना सरकारकडून मोबदला न मिळाल्याने हा रस्ता बंद करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असल्याचे म्हणताना येथील कोल्हेमळा ते पुनम हॉटेल या अष्टविनायक रस्त्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून, त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. यासंदर्भात सन १९७७ पासून शासनदरबारी शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे.

बिबट सफारीसाठी बारामतीला अवघ्या तीन दिवसात साठ कोटी रुपये मंजूर होतात तर ४१ वर्षांपासून नुकसान भरपाई मागत असलेल्या शेतकऱ्यांना निधी का नाही – संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

कुकडी प्रकल्पांतर्गत माणिकडोह धरणाचे बांधकाम सन १९७७ मध्ये सुरू झाले. त्या वेळी पाटबंधारे विभागाने धरणाचे साहित्य वाहतुकीसाठी येथील पूनम हॉटेल ते कोल्हेमळा चौक यादरम्यानचा सुमारे एक किलोमीटर लांबीचा व आठ फूट रुंदीचा हा रस्ता शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेतला. परंतु, अद्याप मोबदला देण्यात आला नाही आज मितीला या रस्त्याचे काम ठेकेदार सोपान बेल्हेकर व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येत असून सदर रस्त्याचे जबरदस्तीने बेकायदेशीर रित्या अधिग्रहण करण्यात आले आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

नारायणगाव ओझर रस्त्यावर आंदोलनाबाबत चे निवेदन देताना नारायणगावचे सरपंच योगेश पाटे एडवोकेट राजेंद्र कोल्हे आदी मान्यवर

दरम्यान,याबाबत ठेकेदार सोपान बेल्हेकर यांनी सदर रस्त्याचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशानुसार केले जात आहे व हा रस्ता नकाशावर आहे असे म्हंटले होते मात्र हा रस्ता नकाशावर पूर्ण नाही व सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याचे काम करण्याबाबतचे कुठलेही पत्र वा कुठलाही आदेश सदर ठेकेदाराने अद्याप दाखवला नसल्याचे येथील बाधित शेतकरी अँड राजेंद्र कोल्हे यांनी सांगितले.


दरम्यान बारामती येथे बिबट सफारीसाठी अवघ्या तीन दिवसात साठ कोटी रुपये मंजूर होतात तर ४१ वर्षांपासून नुकसान भरपाई मागत असलेल्या शेतकऱ्यांना निधी का उपलब्ध होत नाही असा संतप्त सवाल राजेंद्र कोल्हे या शेतकऱ्यांने केला. या आंदोलनाला नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, शिवाजी गायकवाड अमित औटी, तसेच अनेक बाधित शेतकरी उपस्थित होते. नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सदर शेतकऱ्यांना त्यांच्या द्वारे देण्यात आलेले निवेदन हे संबंधित विभागाला देण्यात येऊन याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल मात्र नागरिकांची गैरसोय करू नका असे सांगितल्याने हा रस्ता काही वेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *