आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांचे पुन्हा एकदा स्टिंग ऑपरेशन वेषांतर करून पकडले गुन्हेगार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२८ मार्च २०२२

पिंपरी-चिंचवड


पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांचे नाव ऐकून भल्याभल्यांना घाम फुटतो. याच नावाचा फायदा घेण्याचं नाशिकच्या रोशन बागुलने ठरवलं. यासाठी रोशनने बनावट आयडी कार्ड बनवलं होतं. एका बाजूस महाराष्ट्र पोलीस असा तर दुसऱ्या बाजूला सायबर क्राईमचा उल्लेख होता. त्यावर रोशनचा फोटोही होता. हेच आयकार्ड दाखवून त्यानं पिंपरी चिंचवडमधील एका घर मालकाला धमकावले. तर दुसऱ्या व्यक्तीला जमिनीचा व्यवहार करून देतो असं म्हणाला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी ओळख असल्याचं तो म्हणाला. जमीन व्यवहारात त्यांनी मदत केली नाही तर त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटलांकडून करून घेऊ, असं आश्वासनही त्यानं दिलं. यासाठी पैशाची मागणी रोशनने केली. ही बाब पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या कानावर पडली. मग त्याला धडा शिकविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी वेशांतर करायचं ठरवलं. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामान्य व्यक्तीची वेशभूषा केली. मग निगडीतील एका हॉटेलमध्ये रोशनला बोलविण्यात आले. तिथं स्वतः कृष्ण प्रकाश सामान्य व्यक्तीच्या वेशभूषेत दाखल झाले. सगळी बोलणी झाली, पैसे ही द्यायचे ठरले. पण वरची नोट वगळता खालच्या सर्व नोटा नकली असल्याचं कळताच रोशनचे बिंग फुटले. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला. रोशनला अटक केली. या प्रकरणी रोशनसह गायत्री बागूल आणि पूजा माने अटकेत आहेत. तर अन्य दोघे पळून जाण्याचा यशस्वी ठरले. या दोघांचा शोध सुरु आहे.

या स्टिंग ऑपरेशनसाठी कृष्ण प्रकाश यांनी जी वेशभूषा केली होती त्याचा फोटो व्हायरल झाला.याआधीही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं. तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणि नाके बंदीवर जाऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. वेषांतर करून थेट आरोपींच्या मुसक्या आळवल्या त्यामुळे या गोष्टीचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *