राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ, स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ मार्च २०२२

पिंपरी


भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेला ३१ मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी स्वत:ला अभिव्यक्त करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे  आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या वतीने “राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा या उद्देशाने स्पर्धेच्या मुदतीत वाढ करण्यात आली असल्याचे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेद्वारे सृजनशील अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रत्येक मतातील सामर्थ्याचा पुनरुच्चार करावयाचा आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या मतदाराचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग स्वीप कार्यक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेतून जनतेच्या गुणांना आणि सर्जनशीलतेला आवाहन करतानाच त्यांच्या सक्रीय सहभागातून लोकशाहीला बळकटी दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अशा पाच प्रकारच्या  स्पर्धांचे आयोजन भारत निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले असून या स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुल्या आहेत. लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्व या विषयावर आधारित तयार केलेल्या संकल्पना आणि विचारांना प्रोत्साहित करणे, जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देऊन लोकसहभागातून लोकशाही व्यवस्था मजबूत करणे,हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धांचे वर्गीकरण करण्यात आले असून त्याची विभागणी संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी अशा तीन श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, प्रत्येक श्रेणीमध्ये विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके असतील. संस्थांच्या श्रेणीत ४, तर व्यावसायिक आणि हौशी स्पर्धकांच्या श्रेणीत ३ स्पर्धकांना विशेष उल्लेखनीय पारितोषिक देण्यात येणार आहे.

सर्व प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत ३१ मार्च२०२२ पर्यंत असून, प्रवेशिका [email protected] यावर पाठवण्यात याव्यात.  राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यासाठी https://ecisveep.nic.in/contest/ हे स्वतंत्र  संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे, असे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विविध संस्था, संघटना, महिला बचत गट, महाविद्यालये, खाजगी दवाखाने, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था, औद्योगिक आस्थापना, हॉकर्स, मिळकतधारक, सर्व खाजगी आस्थापनांनासह नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *