पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रभागरचना अखेर रद्द

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ मार्च २०२२

पुणे


जसे तापमान वाढत आहे तसेच राजकीय तापमानातही चढ उतार पाहायला मिळत आहे. निवडणूका केव्हा होणार याची चर्चा आणि अटकळ नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची प्रभागरचना रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झाली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभागरचना तयार करण्याचे काम पूर्ण झाले होते. अशातच सोमवारी राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना पुन्हा एकदा रद्द झाली. प्रारुप प्रभाग रचना अंतिम मानून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्यांची आता डोकेदुखी वाढली आहे. आता नव्याने प्रभागरचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण टाकले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचे आरक्षण कायम असावे अशी भूमिका राज्यातील सर्वच पक्षाने घेतली आहे. त्यामुळे नुकताच विधिमंडळात नवीन कायदा पारित झाला. त्यास राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. या कायद्यात निवडणूक घेण्याबाबत व प्रभागरचना करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले आहेत त्यानुसार ही प्रभाग रचना रद्द झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. निवडणूक आयोगाने या आदेशानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले होते. स्वतःच्या सोयीचा प्रभात तयार करून घेण्यासाठी नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या राज्य पत्रामध्ये पुणे महापालिकेस राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती यांचीही प्रभाग रचना रद्द केलेली आहे. या आदेशामुळे भविष्यात पुन्हा एकदा तीन सदस्यांचा प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाला तयारी करावी लागणार आहे. एकंदरीतच ही प्रभाग रचना रद्द झाल्याने महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *