रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ मार्च २०२२
पिंपरी
जम्मु कश्मिरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त (टॅक्स फ्री) करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादाला बळी पडलेल्या हिंदूचे चित्रण करणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. सदर चित्रपट देशभर गाजत असून, वास्तवाशी निगडीत आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर दहशदवाद्यांनी केलेल्या अत्याचाराची वास्तविकता प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली असून, देशातील जनतेला हा चित्रपट सगळीकडे पाहता येणार आहे. सदर चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला पाहता यावा याकरिता हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांत बळी पडलेल्या, तसेच हिंदू बांधवांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे वास्तव चित्रण ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटात केले आहे. हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. याआधीही गुजरात, हरियाणा आणि कर्नाटक येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.