विख्यात तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांना यंदाचा स्वरसागर पुरस्कार जाहीर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ मार्च २०२२

चिंचवड


चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव आजपासून म्हणजे शुक्रवार(११ मार्च) रोजी सुरु होत असून यावेळी सतरावा स्वरसागर पुरस्कार विख्यात तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी तेजश्री अडिगे यांच्या गणेशवंदनेने महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पंडित विजय घाटे यांना स्वरसागर पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याच वेळी यंदाचा ज्येष्ठ गायक पंडित पद्माकर कुलकर्णी युवा कलाकार पुरस्कार युवा गायिका शाश्वती चव्हाण हिला प्रदान करण्यात येईल. रोख पन्नास हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ असे स्वरसागर पुरस्काराचे स्वरुप आहे.

यंदाच्या स्वरसागर पुरस्काराचे विजेते पद्मश्री पंडित विजय घाटे यांनी बालवयापासूनच तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने तबल्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर तबला सोलो वादनाचे अनेक कार्यक्रम केले. तसेच पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, उस्ताद विलायत खॉ, उस्ताद बिस्मिल्ला खॉ, पं. बिरजू महाराज यासारख्या मान्यवर कलाकारांना साथसंगत केली. पं. विजय घाटे यांना २०१४ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ते त्यांच्या तालचक्र या ट्रस्टमार्फत नवोदितांना वादन आणि नृत्याचे शिक्षण देत आहेत. यंदा महोत्सव तीन दिवस रंगणार आहे. शुक्रवारी उद्घाटनानंतर राहुल शर्मा यांचे संतूरवादन सादर होईल. त्यानंतर सुधाकर चव्हाण यांची कन्या आणि शिष्या शाश्वती चव्हाण हिचे गायन सादर होईल.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी(१२ मार्च) दुपारी दोन वाजल्यापासून गायन व वादनाच्या स्पर्धा सुरु होतील. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता स्वीकार कट्टी यांचे सतारवादन होईल. पुढील सत्रात आम्ही दुनियेचे राजे हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात येईल. संगीत आणि नाट्य यांच्या आविष्कारातून दिग्गज संगीत दिग्दर्शकांची गाणी यात सादर होतात. मराठी चित्रपट संगीताच्या पहिल्या पाच दशकांना मा. कृष्णराव, पु. ल. देशपांडे. श्रीनिवास खळे, सुधीर फडके आणि वसंत प्रभू यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांच्या प्रतिभेमुळे मराठी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. याच सुवर्णकाळाचा वेध घेणारा संगीत नाट्यानुभव म्हणजे ‘आम्ही दुनियेचे राजे’.
महोत्सवाच्या तिस-या दिवशी म्हणजे रविवारी(१३ मार्च) सकाळी दहा वाजल्यापासून नृत्य स्पर्धा सुरु होतील. सायंकाळच्या सत्रात रात्री साडेआठ वाजता पं. नंदकुमार कपोते यांच्या शिष्यांचे नृत्य सादर होईल. त्यानंतर मुग्धा गावकर आणि प्राची जठार यांचे सहगायन होईल. आणि शेवटच्या सत्रात पं. राम देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाचा समारोप होईल अशी माहिती मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *