महापालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहराचा विकास रखडला – माजी आमदार विलास लांडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ मार्च २०२२

पिंपरी


रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण, रस्त्याची दुरवस्था, अनेक ठिकाणचे डीपी रोड ताब्यात घेण्यात आलेले अपयश, फुटपाथची दुरवस्था आदीसह अनेक नागरी प्रश्नांनी शहरातील नागरिक त्रस्त आहेत. महापालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहरातील विकासकामे रखडली असल्याची टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केली. अनेक ठिकाणी अर्धवट कामे केली आहेत. विकासकामे करताना धमक आणि दूरदृष्टी लागते. ती महापालिका सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळेच नागरिकांचा रोष सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उफाळून येत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.

गजानन म्हेत्रे उद्यान जवळील म्हेत्रे चौकात शिवसेनेचे 7 मार्च पासून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे. भोसरी विधानसभेचे उपशहराध्यक्ष नेताजी काशीद, संघटक रावसाहेब थोरात, समन्वयक राहुल भोसले हे उपोषणाला बसले आहेत. या ठिकाणी असणाऱ्या उपोषणकर्त्यांची माजी आमदार विलास लांडे यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. या वेळी लांडे बोलत होते.

नागरी समस्यांबाबत म्हेत्रे चौकात शिवसेनेचे आमरण उपोषण; माजी आमदार विलास लांडे यांचा पाठिंबा

उपोषणकर्त्यांच्या अनेक मागण्या आहेत. या मागण्यांमध्ये गणेश हाऊसिंग सोसायटी येथील रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम काढणे, परिसरातील डीपी रोड पालिकेने ताब्यात घेऊन तिथे पक्के रस्ते करणे. त्रिवेणीनगर चौक ते सेंट अॅन्स स्कूल मधून जाणारा व पुढे कृष्णानगर प्राधिकरणला जोडणारा १२ मी रोड अतिक्रमण काढून पुर्ण करणे. त्रिवेणीनगर मधून जाणारा आरक्षित स्पाइन रोड लवकरात लवकर डांबरीकरण करुण वाहतुकीस खुला करणे. शिवरकर चौक ते साने चौक २४ मी डीपी रोड लवकरात लवकर नागरिकांचे पुर्ण पैसे देऊन ताब्यात घेवुन डांबरीकरण करुण देणे.

कॅ. वाघु साने चॉक ते अष्टविनायक चॉक ते ताम्हाणे वस्ती चौक (चिंचेचा मळा) रोड लवकरात लवकर नागरिकांचे पुर्ण पैसे देवुन ताब्यात घेऊन डांबरीकरण करुण देणे. ज्या नागरिकांचे यामध्ये नुकसान होत आहे त्यांना योग्य मोबदला देणे. सुरक्षित फुटपाथ जागोजागी तयार करणे. परिसरात सुलभ शौचालय योग्यत्या ठिकाणी जागोजागी तयार करणे. प्रभागातील संपुर्ण नाला साफ करून त्यावरील अतिक्रमणे हटविणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

माजी आमदार लांडे म्हणाले की, या बाबत सत्ताधाऱ्यांनी नागरिकांचे हित पाहून त्वरित ही कामे पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र सत्ताधाऱ्यांना या प्रश्नांची अनास्था दिसते. जाणीवपूर्वक काही कामे रखडवली जात आहेत. त्यामुळे उपोषणकउर्त्यांचे हे प्रश्न पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीच्या संबंधित मंत्र्यांकडे मांडू. रखडलेल्या या विकासकामाला गती देऊन हे प्रश्न सोडवू असे लांडे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *