युक्रेनमध्ये अडकलेल्या शिरूरच्या MBBS विद्यार्थ्यांनी स्वःदेशात पाऊल ठेवले आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला : विमानतळावरील स्वागताने गेले भारावून

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०८ मार्च २०२२

शिरूर


रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू झाले आणि तेथे MBBS शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर संकट ओढवले. सर्व भारतीय विद्यार्थी, त्यांचे पालक व देशवासीय हळहळू लागले. शिकायला गेलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप स्वःदेशी आणण्यासाठी, भारत सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यांनी ऑपरेशन गंगा सुरू केले. भारतीय दुतावासातून सतत प्रयत्न सुरू होते आणि त्याला यश येऊन आम्ही सर्व भारतीय विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतलो. सर्वांनाच एकाचवेळी आणणे शक्य नसल्याने, जमेल तसे टप्प्या टप्प्यात विद्यार्थी भारतात येऊ लागले. आम्ही शिरूर तालुक्यातील तेराजण होतो. त्यातील आम्ही सौरभ दादासाहेब गवारे, आदित्य अर्जुन निचीत, सुशांत लहू शितोळे, आशिष विजय वराळ, प्रतिक रावसाहेब मुसळे, विशाल विलास उचाळे, सिध्दी संजय फटांगडे, प्रकर्षा कन्हैयालाल दुगड अशा सात जणांनी, युक्रेन (खारकीव) मधुन भारतात एकाचवेळी प्रवास केला. आमचे पुणे विमानतळावर रात्री एक वाजता उस्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा औद्योगिक आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, पालक व आप्तेष्ट उपस्थित होते.

आम्ही सर्वांनी भारतीय ध्वज म्हणजेच तिरंगा हातात घेऊन, मोठ्या आनंदाने व अभिमानाने “भारतमाता की जय” च्या घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. युक्रेनमधून आम्ही बाहेर पडताना युद्ध सुरु होते. आणि अशा परिस्थितीत सुमारे आठ किलोमीटर पायी प्रवास करुन लपतछपत रेल्वेस्टेशन गाठले. त्यानंतर अत्यंत बिकट परिस्थितीत १३०० कि. मी. चा रेल्वे प्रवास करत, नंतर टॅक्सी तसेच मिळेल त्या वाहनाने प्रसंगी पायी प्रवास करुन पोलंड बाॅर्डर गाठली. अशा सर्व अवघड प्रसंगात संघर्ष करत व अनेक कठीण समस्यांचा सामना करत पोलंड देशात प्रवेश केलेला होता. भारतीय दुतावासाने अत्यंत चोख व्यवस्था करुन आमची राहण्याची व जेवणाची सोय केलेली होती. नंतर विमानाने दिल्ली व नंतर पुणे विमानतळावर ७ मार्च च्या पहाटे १ वाजता आम्ही सर्वजण सुखरूप पोहोचलो.

येथील उत्स्फूर्त स्वागताने आम्ही सर्वजण भारावून गेलो. आम्हाला खुप आनंद झालेला होता, की आम्ही सर्वजण स्वदेशी व अगदी सुखरूप पोचलो. शेवटी ऑपरेशन गंगा यशस्वी झाले. दरम्यानच्या काळात शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोकबापू पवार यांनी सतत संपर्कात राहून, आम्हाला मानसिक आधार दिला. माजी आयुक्त व शिरूरचे भूमिपुत्र किशोर राजे निंबाळकर यांनीदेखील, दुतावासाशी सतत संपर्क करुन खुप मोलाची मदत केली. या कठीण काळात आपले कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची प्रतीमा व भारतीय तिरंग्याचा खूप आधार वाटला. आम्ही सुखरूप मायदेशात पोहचलो हेच आमच्यासाठी खूप आहे.

दरम्यानच्या काळात आमच्या पालकांशी अनेक जणांचा व पत्रकार बांधवांचा सतत पाठपुरावा व चौकशी सुरू असल्याची, आम्हाला माहिती मिळत होती. ज्यांनी ज्यांनी आमच्या कठीण काळात आम्हाला व आमच्या कुटुंबाला मानसिक आधार दिला, त्या सर्वांचेच आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. त्यामुळे मी व माझे सर्व मित्र या सर्वांचेच आभार मानून त्यांना दुखवू शकत नाही, तर त्या सर्वांच्याच ऋणात राहणे पसंत करतो.

शब्दांकन : सौरभ दादासाहेब गवारे, विद्यार्थी, MBBS, युक्रेन. (मूळ : शिरूर, जी. पुणे, महाराष्ट्र)


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *