रामलिंग यात्रेला दोन लाखांचा जनसमुदाय : भव्य बैलगाडा शर्यतीत पाच लाखांची बक्षिसे : यात्रा उत्साहात संपन्न

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०४ मार्च २०२२

रामलिंग/शिरूर


यंदा सर्वत्रच यात्रा – जत्रा प्रचंड उत्साहात साजऱ्या होत आहेत. आणि त्यात आणखी भर पडली ती बैलगाडा शर्यतींची. बैलगाडा शर्यतींमुळे लोकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. त्याच बरोबर या सर्व गोष्टींमुळे अर्थकारण ही बळकट होऊ लागलेय. कोरोनाच्या काळात सर्व व्यवसाय कोलमडलेले होते. छोट्या व्यावसायिकांची उपासमार होत होती. शास्त्रज्ञांनी कोरोना या साथीरोगावर मात करत लस शोधली व शासनाने लसीकरणाची मोहीम जोरदार राबवून, कोरोनाला हद्दपार केलेय. आणि त्यामुळेच यात्रा, जत्रा, हॉटेल, मॉल सुरू होऊन सर्वसामान्यांच्या अर्थकारणाला बळकटी मिळू लागली आहे.

शिरूर पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असणाऱ्या महादेव प्रभू रामलिंग देवस्थानचा यात्रोत्सव, महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य दिव्य प्रमाणावर सर्वजण साजरा करतात. यात शिरूर ग्रामीण (रामलिंग) सह, शिरूर शहर, अण्णापुर, सरदवाडी, कर्डिलवाडी, तरडोबाचिवाडी या गावांव्यतिरिक्त तालुक्यातून व शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांतील लोक मोठ्या भक्तिभावाने रामलिंग च्या दर्शनासाठी येत असतात. सोमवार दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता शिरूर शहरातील एस टी बस स्टँड जवळील शिवसेवा मंडळामधून प्रभू रामलिंग महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. ही पालखी मिरवणूक संपूर्ण शिरूर शहरातून वाजत गाजत निघून, १ मार्च रोजी पहाटे तीन वाजता रामलिंग येथील महादेव मंदिरात येऊन स्थानापन्न झाली. मात्र रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलेली होती. दि १ मार्च रोजी रात्री नऊ वाजता शोभेचे दारुकाम (आतिषबाजी) झाले. तर यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि २ मार्चला सकाळी आठ वाजल्यापासून बैलगाडा शर्यतींची सुरुवात रामलिंग ट्रस्टचे ट्रस्टी व रामलिंग ग्रामस्थ यांनी नारळ फोडून केली. यात्रा उत्सव काळात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२२ पर्यंत होऊन, त्याची सांगता ज्ञानेश्वरमाऊली महाराज पिंगळे यांच्या काल्याच्या किर्तनाने २ मार्च रोजी झाली. यावेळी महाप्रसाद धनगरवाडा समाज मंडळाच्या वतीने देण्यात आला.


यंदा दीड ते दोन लाख भाविक यात्रा व बैलगाडे शर्यतींसाठी आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. त्यातच बैलगाडा शर्यतींवरील बंदीही न्यायालयाने उठविल्याने, अनेक ठिकाणी शासकीय नियमांचे पालन करत शर्यती भरत आहेत. रामलिंग यात्रा महोत्सवातही शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करत, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ एन पी पडवळ यांच्या नेतृत्वाखाली पशुधन विकास अधिकारी डॉ जी पी सातकर, डॉ आर डी यादव, डॉ इरफान सय्यद तसेच, पशुधन पर्यवेक्षक डॉ श्रीपती खोमणे, डॉ एच डी थोरात, डॉ व्ही एस घोडेकर यांच्या टीमने बैलांची आरोग्य तपासणी करून, बैल आजारी तर नाही ना ? तो पळण्यास सक्षम आहे का ? त्याला ताप, हगवण आहे का ?आदी तपासण्या करून, तशा पद्धतीचे औषधोपचार जागेवरच करून दिले. तसेच पळण्यास सक्षम असणाऱ्या बैलांना जागेवरच हेल्थ फिट सर्टिफिकेट दिली. तर काही बैलगाडा मालकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातून, नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून दाखले आणलेले होते.तसेच, यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार, शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही नेमणुका शिरूर तहसीलदार यांनी केलेल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आवश्यक कार्यवाहीसाठी एकाच ठिकाणी कुठल्याही अडचणीसाठी संपर्क व्हावा म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर अंतर्गत या नेमणूका होत्या. त्यात यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ मार्च २०२२ रोजी, सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत एकनाथ ढाके, मंडलाधिकारी, टाकळी हाजी यांच्या पथकात तलाठी देशमुख, तलाठी पी बी कोळगे, तलाठी डी के वाळके, तलाठी डी व्ही रोडे यांच्या नेमणूका होत्या. तर दुपारी २.३० ते कार्यक्रम संपेपर्यंत प्रशांत शेटे, मंडलाधिकारी, पाबळ यांच्या पथकात तलाठी व्ही डी बेंडभर, तलाठी एस आय कमलीवाले, तलाठी अमोल ठिगळे व तलाठी एस बी शिंदे यांच्या नेमणुका होत्या. प्रत्यक्ष हजर राहून कायदा व सुव्यवस्था राखत, यात्रा कमिटी व प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून, नियंत्रक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या सूचनांनुसार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे, अशा शिरूर, रांजणगाव व यवत पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व होमगार्डच्या नेमणुका केलेल्या होत्या. त्यांची अनेक पथके तयार करून कायदा – सुव्यवस्था, ट्रॅफिक आदी महत्वाच्या कामांसह गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल ड्रेस तसेच युनिफॉर्म मध्ये पेट्रोलिंग करत, यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

दि २ मार्च रोजी बैलगाडा शर्यतीनंतर रामलिंग येथे संध्याकाळी बैलगाडा इनाम वाटप करण्यात आले. सुमारे पाच लाखांचे विविध इनाम यावेळी वाटण्यात आले.फायनल सम्राटमध्ये प्रथम क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील गव्हाणवाडी येथील पांडुरंग किसन काळे यांच्या बैलगाडयाने ११.८० सेकंदात धावून मिळविला, दुसरा क्रमांक आव्हाळवाडी, ता. हवेली येथील शिवराज नारायण आव्हाळे यांच्या बैलगाड्याने १२.१४ सेकंदात धावून मिळविला, तिसरा क्रमांक आंबेगाव तालुक्यातील झारकरवाडीचे बाळासाहेब ढोबळे यांच्या बैलगाडयाने १२.३८ सेकंदात धावून मिळविला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,५१,००० रु होते. त्यात एकूण २५ बैलगाडे जिंकले. दुसरे बक्षीस १,०१,००० रु होते. त्यात ३७ गाडे जिंकले. तिसरे बक्षीस ७५००० रु होते. त्यात ३० गाडे जिंकले. चौथे बक्षीस ५१००० रु होते. त्यात १६ गाडे जिंकले. तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस ३१,००० रु होते. त्यात १४ गाडे जिंकल्याची माहिती ट्रस्टीनी दिली.यावेळी बैलगाडा अनौन्सर म्हणून माऊली मुळे (वरुडे), आण्णा जाधव (पाबळ), संतोष ढोकले (करंदी), शिवाजी ढोरे (टाकळी भीमा) यांनी पाहिले. कोरोनामुळे मागील वर्षी यात्रा भरलेली नव्हती. परंतु यंदा शासनाने यात्रा व बैलगाडा शर्यतींना सशर्थ परवानगी दिल्याने, यात्रा उत्सव फार मोठ्या स्वरूपात, उत्साहात व कुठलेही गालबोट न लागता संपन्न झाल्याचे रामलिंग मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल व शिरूर ग्रामीणचे सरपंच नामदेवराव जाधव यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.

यात्रोत्सव व सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ट्रस्टच्या अध्यक्षांसह, शिरूर हवेलीचे आमदार ऍड अशोकबापू पवार, ट्रस्टचे सहसचिव तुळशीराम मनिराम परदेशी, खजिनदार पोपट शंकर दसगुडे, विश्वस्त गोदाजी कोंडाजी घावटे पा., विश्वस्त रावसाहेब बाबुराव घावटे पा., विश्वस्त वाल्मिक धोंडिबा कुरंदळे, विश्वस्त बलदेवसिंग केशरसिंग परदेशी, विश्वस्त नामदेवराव शंकर घावटे, सल्लागार जगन्नाथ जिजाबा पाचर्णे, सल्लागार बबन सीताराम कर्डीले व कारभारी मारुती झंजाड गुरुजी या ट्रस्टीनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांना शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यमान सरपंच नामदेव जाधव, उपसरपंच नितीन बोऱ्हाडे, आदर्श सरपंच अरुण घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, माजी सरपंच तुषार दसगुडे, माजी सरपंच सोमनाथ घावटे, माजी उपसरपंच अभिलाष घावटे, सागर घावटे, संजय शिंदे, भरत बोऱ्हाडे, मेजर नामदेव घावटे, बाबाजी वर्पे तसेच अमोल वर्पे, यशवंत कर्डीले, अनिल लोंढे, हिरामण जाधव, राहुल महाजन आदींनी हिरीरीने भाग घेऊन यात्रा उत्सव सुरळीत पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *