खासदार श्रीरंग बारणे यांच्या जनता दरबाराला उत्स्फुर्त प्रतिसाद; नागरिकांनी मांडले गाऱ्हाणे, ५०० तक्रारी प्राप्त

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०३ मार्च २०२२

पिंपरी-चिंचवड


मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांचा  उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाणी, वीज, ड्रेनेज लाईन, रस्ता, अनधिकृत बांधकामे, महावितरणचे धोकादायक पोल अशा विविध विभागाच्या तब्बल 498 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व विभागांनी जनतेच्या तक्रारीचा तातडीने निपटारा करावा. सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होऊ देऊ नका, त्यांना आपल्या कार्यालयात खेटा मारायला लावू नका, अशा सूचना खासदार बारणे यांनी अधिका-यांना दिल्या.

तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे खासदार बारणे यांचे प्रशासनाला आदेश

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील  अॅटो क्लस्टरमध्ये आज (गुरुवारी) सकाळी 11 ते दुपारी दीड या दरम्यान हा जनता दरबार झाला. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, तहसीलदार गीता गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड, महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, उमेश कवडे, अन्नधान्य पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, मोटार वाहन निरीक्षक वृंदा त्रुरावे, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले, रेल्वेचे चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर संजीव सोन्ना, अभियंता मुकेश कुमार, पीएमआरडीच्या विशाखा चिंतल, पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, वायसीएमचे वैद्यकीय अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, पालिकेचे कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, महापालिकेच्या संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख वैभव थोरात, योगेश बाबर, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, निलेश बारणे, नगरसेविका रेखा दर्शिले, मधुकर बाबर,  युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत को-हाळे,  बाळासाहेब वाल्हेकर, संतोष सौंदणकर, माजी नगरसेविका विमल जगताप, मावळच्या महिला संघटिका शैला खंडागळे, वैशाली मराठे,  सरिता साने,सुनील हगवणे ,बशीर सुतार, रवी नामदे, विजय साने, संतोष वाळके, रुपेश कदम, राजेंद्र तरस, निलेश हाके, निलेश तरस, प्रतीक्षा घुले आदी उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड, भोसरी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने जनता दरबारात उपस्थित होते. नागरिकांनी आपली गा-हाणी, समस्या, प्रशासनाकडून कामे करताना होत असलेला विलंब सांगितला. आपली कैफियत मांडली. वीज, पाणीपुरवठा, संथ गतीने सुरु असलेली कामे, ड्रेनेची समस्या, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, स्मशानभूमी अशा विविध विभागाशी संबंधित तक्रारी नागरिकांनी दरबारात मांडल्या. खासदार बारणे यांनी सर्व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. नागरिकाने समस्या सांगताच तत्काळ संबंधित विभागाच्या अधिका-याला खासदार बारणे यांच्याकडून तक्रार मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. तक्रार सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने आणि ती मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतल्याने नागरिकांनी खासदार बारणे यांचे आभार मानले.

खासदार बारणे म्हणाले, ”लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावणे माझे काम आहे. नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित तक्रारी एकाच छताखाली निकाली निघाव्यात यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. या माध्यमातून जनतेच्या काय समस्या आहेत, हे अधिका-यांना कळले. जनता दरबारात ४९८ नागरिकांच्या लेखी तक्रारी आल्या आहेत.  या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागाला पाठविण्यात येतील. ज्या तक्रारी तत्काळ निकाली निघतील. त्याचे प्रशासनाने तातडीने निराकरण करावे. ज्या तक्रारी मार्गी लागू शकत नाहीत. अडचणीच्या आहेत. त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांशी बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. किती तक्रारी निकाली निघाल्या. याचा मी स्वत: १५ दिवसांनी आढावा घेणार आहे. तक्रारदाराला तक्रारीचे निराकरण झाल्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले जाईल. निराकरण झाले नसेल. तर, कोणत्या कारणामुळे झाले नाही. तेही तक्रारदाराला लेखी पत्राद्वारे कळविण्यात येईल”.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड, परताव्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून त्याला लवकरच मंत्रीमंडळाची मान्यता मिळेल. एकीकडे लोकप्रतिनिधी जनतेत येत नाहीत. पण, आम्ही जनतेशी एकरुप होऊन त्यांच्या समस्या सोडवित असल्याचेही खासदार बारणे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *