गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराच्यावतीने भव्य शिवअभिवादन मिरवणुक

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२१ फेब्रुवारी २०२२

नारायणगाव


“छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करताना त्यांचे विचारही आचरणात आणा, महाराजांची गुणवैशिष्ट्ये आपल्या जीवनात मूल्य म्हणून रुजवा ” असे प्रतिपादन नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबू) पाटे यांनी केले. ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या शिवअभिवादन मिरवणुकीत राजा शिवछत्रपती प्रवेशद्वारावरील स्मारकास अभिवादन प्रसंगी सरपंच पाटे बोलत होते. यावेळी नारायणगावचे माजी उपसरपंच संतोष दांगट,विद्यामंदीराचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, धर्मवीर संभाजी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, उपाध्यक्ष शंकरराव कोल्हे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी,भागेश्वर डेरे,प्रवीण डेरे, राजेंद्र कोल्हे,सिताराम खेबडे,कैलास औटी यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी,शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा – योगेश पाटे

या शिवअभिवादन मिरवणुकीची सुरुवात गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषण,पोवाडा गायन सादर केले. तद्नंतर पश्चिम वेशीवरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. येथील धर्मवीर संभाजी पतसंस्थेने सर्व विद्यार्थी, शिक्षकांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था केली होती. पश्चिम वेस,शिवाजी चौक ते राजा शिवछत्रपती प्रवेशद्वारापर्यंत ही मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली होती. मिरवणुकीतील भव्य रथावरील बाल शिवाजी, मावळे व नटलेल्या महाराष्ट्र कन्या, नृत्य करणारा अश्व, पारंपारिक वाद्य,पोवाडा गायन,तुतारी,महाराजांचा जयघोष या सर्वांनी उपस्थितांची मने जिंकली.


“सबनीस विद्यामंदिराच्या वतीने दरवर्षी शिवअभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्राची परंपरा, इतिहासाचे स्मरण आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाच्या सहकार्याने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते “असे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांनी सांगितले. मिरवणुकीचे आयोजन काशिनाथ अल्हाट,सुभाष दुबळे, आशिष कोल्हे, क्रीडाप्रमुख भिमराव पालवे,राहुल नवले,मेहबूब काझी, एन.सी.सी. ऑफीसर रोहित भागवत, अनुपमा पाटे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *