पिंपरी चिंचवड शहरात राजकीय वातावरण तापले राष्ट्रवादीच्या आंदोलनाला आमदार महेश लांडगे यांचा पलटवार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात गेल्या पाच वर्षांत लक्षवेधी विकासकामे झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विकासाच्या मुद्यांवर राजकारण करावे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरच निवडणूक लढायची असेल, तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काळातील अनेक प्रकरणे भाजपाकडे आहेत. त्यापेक्षा १५ वर्षांत राष्ट्रवादीने काय विकास केला? आणि ५ वर्षांत भाजपाने काय विकास केला? अशा मुद्यावर समोरासमोर चर्चा करावी, अशी रोखठोक भूमिका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी सकाळी चिंचवड स्टेशन चौकातून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. याबाबत आमदार लांडगे यांनी प्रसिद्धीप्रत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

विकासाच्या मुद्यावर राजकारण व्हावे, १५ वर्षे विरुद्ध ५ वर्षे असा सामना व्हावा : आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत होती. २०१७ पासून भाजपा सत्ताधारी आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वोतोपरी योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात आम्ही शहरवासीयांना आधार देण्याची भूमिका ठेवली आहे. आता निवडणुका आल्या की, राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप होत राहणार आहेत. पण, पिंपरी-चिंचवडमधील राजकारण केवळ शाश्वत विकासाच्या मुद्यावर व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, कोणी कोणत्या मुद्यावर राजकारण करावे. हा ज्या-त्या पक्षाचा निर्णय आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरच निवडणूक लढवायची झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १५ वर्षे महापालिकेच्या सत्तेत होती. त्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरसुद्धा चर्चा व्हायला हवी. भाजपाच्या प्रदेश नेतृत्त्वाकडे सर्व भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे पुरावे आहेत. मात्र, भाजपा आगामी निवडणूक पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताची आणि शाश्वत विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोर्चावर मांडली रोखठोक प्रतिक्रिया

गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी जी विकासकामे करण्यात आली. त्याची योग्य पोहोचपावती मतदार आणि नागरिक देतील. तसेच, शहरावासीय पुन्हा बहुमताने भाजपाला काम करण्याची संधी देईल, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *