पिंपरीचा आगामी महापौर ठरविण्यात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भूमिका निर्णायक – उदय सामंत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


जनमत पाठीशी असणारे, पक्षविरहित काम करणारे, संसदरत्न अशी खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांची ओळख आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे खासदार आप्पा बारणे पक्षविरहित सामाजिक काम करतात. त्यामुळेच त्यांना पिंपरी-चिंचवडमधून मोठे मताधिक्य मिळते. पिंपरी- चिंचवडचा महापालिकेचा आगामी महापौर ठरविण्यात खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांची भूमिका निर्णायक असणार आहे, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आदर्श व्यक्ती, संस्थांचा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी (दि.१६) गौरव करण्यात आला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला.  सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, माजी मंत्री, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, खासदार बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे, युवा सेनेचे राजेश पळसकर, पुण्याचे शहरप्रमुख गजाजन धरगुडे, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, वैशाली मराठे, उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते.

मंत्री सांमत म्हणाले, “चष्मे बदलल्यानंतर आप्पा सारखे नेते आमच्या आयुष्यात आले. कौटुंबिक नाते निर्माण झाले. मंत्री म्हणून मी या कार्यक्रमाला आलो नाही. कुटुंबातील सदस्य म्हणून आलो. खासदार आप्पाबारणे यांनी कोरोना काळात हॉस्पिटलने जास्त आकारलेल्या बिलाची रक्कम रुग्णांना परत मिळवून दिली. लोकसभेत विविध प्रश्न मांडणारे व्यक्ती खासदार म्हणून मावळ मधील नागरिकांना मिळाली. हे सर्वांचे भाग्य आहे. आप्पाकडून शिकण्यासारखे खूप आहे. त्यांचे कार्य आदर्शवत आहे”.

“आता आप्पा घाटा खालची चिंता करू नका, खाली उभे राहणाऱ्याला कात्रजचा घाट दाखविल्याशिवाय राहणार नाही.  महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमासाठी जातो. तिथे मला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून ओळखत नाहीत. परीक्षा रद्द करणारा मंत्री आला. परीक्षा रद्द करून पास करणारा मंत्री अशी माझी पब्लिसिटी झाली. या भावनेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढले पाहिजे”, असेही ते म्हणाले. आदेश बांदेकर म्हणाले, “खासदार श्रीरंगआप्पा बारणे यांची घोडदौड सुरू झाली असून ही थांबणार नाही. बाळासाहेब, उद्धव ठाकरे साहेब यांचे आप्पाना आशीर्वाद आहेत. आप्पा कुटूंबाप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेतात. मतदारसंघातील नागरिकांसाठी नेहमी धडपड करतात. ते स्वतःसाठी कधीही काही मागत नाहीत. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतात”.

सचिन अहिर म्हणाले, “सगळ्या गोष्टींना भेदून खासदार श्रीरंग आप्पा बारणे पाचवेळा संसदरत्न पुरस्कारापर्यंत पोहोचले. लोकसभेत मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडून मार्गी लावतात. खासदार श्रीरंगआप्पा शिवसेनेतील रत्न आहेत. आता त्यांना पक्ष म्हणून मोठी जबाबदारी दिली पाहिजे. त्यांनी मतदारसंघापुरते मर्यादित राहू नये. राज्यभर कामाची व्याप्ती वाढवावी”. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील सदस्याला बाळासाहेब, उद्धव ठाकरे साहेब यांनी संधी दिली. त्यांच्यामुळे मी देशाच्या लोकसभेत काम करून माझी ओळख निर्माण करू शकलो. मागील आठ वर्षात लोकसभेत १५०९ प्रश्न मांडले. ३९३ वेळ लोकसभेत बोललो. २७  खासगी विधयके मांडली. उध्दवजी यांच्या मार्गदर्शनामुळे मी हे काम करू शकलो आणि करत आहे”. फाऊंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी नियोजनात पुढाकार घेतला होता.

‘या’ आदर्श व्यक्ती, संस्थांचा केला सन्मान –

शहरातील लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा  गौरव केला. त्यामध्ये वारकरी भूषण पुरस्काराने ह.भ.प बंडोपत शेळके, ह.भ.प महादेव भुजबळ, आधार भुषण पुरस्काराने कष्टकरी संघटनेचे बाबा कांबळे, सेवा भुषण पुरस्काराने वृद्धाश्रम चालविणा-या डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य, क्रीडा शिक्षक पुरस्काराने बन्सी आठवे, कामगार भूषण पुरस्काराने किशोर ढोकळे, सौंदर्यवती पुरस्काराने पुनम डायडेम, स्वामी भुषण पुरस्काराने शिवतेजनगर येथील ज्येष्ठ नागरिक हरी शेळके, शौर्य पुरस्काराने  धनश्री जाधव, समाजभुषण पुरस्काराने आपला परिवाराचे  एस.आर.शिंदे, पोलीस मित्र भुषण पुरस्काराने  गजानन चिंचवडे, क्रीडा भुषण पुरस्काराने  आयपीएलमध्ये पहिला शतक करणारा सांगवीतील ऋतुराज गायकवाड, समाज भुषण पुरस्काराने  मंदार देव महाराज, क्रीडा पुरस्काराने  सायकलिंग करणारे बाबा भोईर, भुषण पुरस्काराने  भाऊसाहेब कोकाटे, स्वामी भुषण पुरस्काराने  स्वामी समर्थ मंडळ, निसर्ग भुषण पुरस्काराने  जग्गनाथ जरग वृक्ष मित्र, वृक्ष संवर्धन, कर्तव्य भुषण पुरस्काराने  वाकड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, आदर्श भुषण पुरस्काराने ग्रीन्स सोसायटी, पर्यावण भुषण पुरस्काराने जगन्नाथ वैद्य, धन्वंतरी भुषण पुरस्काराने डॉ. सुधीर भालेराव, आदर्श सोसायटी पुरस्काराने पार्क स्ट्रीट सोसायटी आणि उद्योग भुषण पुरस्काराने संतोष बारणे यांचा सन्मान करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *