शिवजन्मभूमीत पावन झालेले रत्न म्हणजेच प्रा.विनायक खोत

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१५ फेब्रुवारी २०२२

जुन्नर


शिवजन्मभूमी मध्ये लहानाचा मोठा होत असताना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण  होते. याचमुळे शिवस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गडांचे, शिवदुर्गांचे रक्षण व संवर्धन करण्याचा ध्यास घेतल्यामुळे जुन्नर येथील शिक्षक व बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रा विनायक खोत यांना या वर्षीचा शिवनेरी भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. एका सधन शेतकरी कुटुंबात , छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत विनायक खोत यांचा जन्म झाला. एक सर्वसाधारण विद्यार्थी ते एक किल्ले संवर्धक हा प्रवास खोत सरांनी आपल्यापुढे मांडला आहे.

जोपर्यंत अंतिम श्वास तोपर्यंत किल्लेसंवर्धनाचा ध्यास – प्रा. विनायक खोत

शालेय जीवनाची सुरवात शाळा क्र.१ ( जुन्नर नगर पालिका ) , माध्यमिक शिक्षण शं.बु.पाटील विद्यालय,जुन्नर  व महाविद्यालयीन शिक्षण श्री शिव छत्रपती महाविद्यलय,जुन्नर याठिकाणी झाले व या पुस्तकी शिक्षणानंतर ख-या अर्थाने जीवनोपयोगी शिक्षण तेथून पुढे ते आजतागायत घेत आहे. लहानपणापासून वडिलांना होमगार्डचा गणवेश परिधान करतांना पहायचो तेव्हांपासूनच भारतिय सशस्र सेनेमध्ये अधिकारी म्हणून जायचे हे सरांनी मनाशी पक्के ठरवले होते. त्यासाठी आदरणीय गुरूवर्य प्रा.मेजर एन.ए.रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. तसेच बास्केटबॉल, हॅन्डबाॅल, टेबल- टेनिस, व्हाॅलीबाॅल, खो-खो,उंच उडी इ. क्षेत्रांमधे प्रगती करत होते. पण लाडक्या आज्जीच्या हट्टामुळे सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न भंगले. मग मोर्चा क्रीडाशिक्षक होण्याकडे वळवला.कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर सातारा येथील क्रांतिस्म्रृती शारिरीक शिक्षण महाविद्यलयात प्रवेश घेउन १९९० मधे श्री शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूरच्या मेरीट लिस्टमधे ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले व ख-या अर्थाने व्यावसायिक जीवनात प्रवेश केला,अर्थात शिक्षकी सेवेचे रुपांतर व्यवसायामधे करणे आजपर्यंत जमलेच नाही हे मात्र नक्की.

बालवयापासून छत्रपती शिवरायांविषयी असलेली ओढ शालेय व महाविद्यलयीन काळात वाढतच होती.पण नेमके काय करायचे हे कळत नव्हते.१९८४-८५ सालात खोत सरांनी ६ जणांसह कडेलोटमार्गे शिवनेरी सर केला. पण अजूनदेखील किल्ला म्हणजे काय हे उमगत नव्हते. असेच ९/१० वर्षे जीवन शिक्षणाची लढाई यशस्वी करण्यात निघून गेली. एक दिवस अचानक सरांची महाविद्यालयीन मैत्रीण सुजाता कवळे क्षीरसागर त्यांचे पती समवेत जुन्नर मध्ये भेटले. पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करत मिलिंद क्षीरसागर या बालपणीच्या मित्राचा नव्याने परिचय झाला. त्यांनी १९९७ मध्ये स्थापन केलेल्या  शिवाजी ट्रेल या संस्थेचे खोत सर सदस्य झाले. व येथून पुढे खऱ्या अर्थाने शिवरायांच्या गडकोटांचा अभ्यास सुरू झाला. दुर्ग संवर्धन कार्यात शिवाजी ट्रेल बरोबर सहभागी होत असताना दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर,निनाद बेडेकर सर, बाबासाहेब पुरंदरे, प्रा. प्र के घाणेकर ,डॉ सचिन जोशी,पांडुरंग बलकवडे सर ,मंजिरी भालेराव मॅडम ,  आप्पा परब  इत्यादी तज्ज्ञ इतिहास अभ्यासकांच्या संपर्कात राहात गडकोटांच्या इतिहास ,त्यांची बांधणी स्थापत्य, भौगोलिक परिस्थिती ,छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास त्याचबरोबर प्राचीन ,मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहास या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेत सरांसारखा एक नर्मदेतील गोटा तज्ञ  अभ्यासकांच्या परिसस्पर्शाने प्रगल्भ होत गेला. आज दुर्ग संवर्धक , दुर्ग वाचक म्हणून सर्वांची जी काही ओळख आहे त्याचे सर्व श्रेय वर उल्लेख केलेल्या आदरणीय तज्ज्ञ इतिहास अभ्यासकांना व लेखकांना विनम्रपणे ते देतात.उपरोल्लेखित महनीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली वाचन दुर्गसंवर्धन कार्य सन २००० पासून सुरू झाले ते आजही अव्याहतपणे सुरू आहे.

दि.२६ फेब्रुवारी २००५ हा दिवस सरांसाठी खूप भाग्याचं आहे. या दिवशी जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंडची निवड दुर्गमहापूजेसाठी शिवाजी ट्रेल ने केली होती व पूजेसाठी सर व त्यांच्या पत्नी सौ जयश्री यांना बसण्याचा बहुमान मिळाला. या दिवसानंतर जुन्नर तालुक्याचे ऐतिहासिक वैभव जाणून घेणे व तालुक्यातील सातही किल्ल्यांसाठी काही तरी करावे हा विचार अधिक दृढ झाला. हा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी अनेक नामवंत इतिहास अभ्यासकांचा, तज्ज्ञांनी लिहिलेल्या अभ्यास पूर्ण ग्रंथांचा अभ्यास सन २००० सालापासून आजतागायत सुरूच आहे. या वाचनामुळे सरांना जुन्नर तालुका किती प्रगल्भ आहे हे समजण्यास खूप मोलाची मदत झाली.आत्तापर्यंत शिवाजी ट्रेल च्या माध्यमातून सन दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पर्यंत स्वखर्चाने पुणे, नगर नाशिक ,औरंगाबाद, बुलढाणा, जालना, धुळे, नंदुरबार सातारा सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये दुर्गसंवर्धन कार्यशाळा (किल्ले संवर्धन का व कसे करावे) घेत भटकंती केली.अर्थात हे सगळे उपक्रम सुट्ट्यांच्या कालावधी मधेच पार पाडले. न्यू इंग्लिश स्कूल खामगाव तालुका जुन्नर या माध्यमिक विद्यालयात १९९२ पासून सर शिक्षकी सेवेत कार्यरत आहेत. व त्या भूमिकेला ९०% न्याय देत ते या इतिहास वाचनाचे व अभ्यासाच्या छंदाचे रूपांतर दुर्गसंवर्धनामध्ये केव्हा झाले हे त्यांनाही फारसे आठवत नाही. सन २००८ ते २००९ या वर्षभरात किल्ले चावंड चा अभ्यास करत २०१० पासून प्रत्यक्ष कार्य सुरू केले ते २०१६ पर्यंत..!

गडावर जाण्याचा मार्ग स्वच्छ करणे, धोकादायक ठिकाणी वनविभागाच्या मदतीने रेलिंग लावणे, शिवकालीन टाके गाळमुक्त करणे, नवीन वास्तूंचा शोध घेणे , असलेले अवशेष पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मूळ कामास धक्का न लावता संवर्धित करणे, किल्ले संवर्धन कार्यात ग्रामस्थांना सहभागी करून घेणे, त्यांना गाइड प्रशिक्षण देणे यासारखी अनेक कामे चावंड गडावर सरांनी केली आजतागायत व करत आहेत. सन २०१४ – १५ या कालावधीत किल्ले नारायणगडाचा अभ्यास करत हिवरे व खोडद येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने किल्ले संवर्धनाचे कार्य सुरू केले, यात तेथील ग्रामस्थांनी व विशेष म्हणजे युवकांनी खूप चांगली साथ दिली. खोडद येथील शालेय मुला मुलींसाठी हिस्ट्री क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना मर्दानी युद्धकलेची प्रशिक्षण दिले.सन २०१७ – १८ यादरम्यान मरहट्टे सह्याद्रीचे या ध्येयवेडय़ा ग्रुपला किल्ले शिवनेरीवर किल्ला का पहावा व कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. याच ग्रुपच्या माध्यमातून किल्ले हडसर उर्फ पर्वतगड  संवर्धन सुरू झाले ते आजतागायत पावसाळा वगळता सातत्याने शनिवार रविवार सुरु आहे.१९ फेब्रुवारी २०१५ रोजी छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी किल्ले शिवनेरीवर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळ यांच्यासमोर प्रा. खोत सर व ३० विद्यार्थ्यांच्या पथकाला शिवकालीन मर्दानी युद्धकला प्रात्यक्षिके सादर करण्याचे भाग्य मिळाले.

जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक वारसा समजून घेत असताना इतिहास ,जैवविविधता, संस्कृती, पर्यावरणीय बदल या विषयांवर अभ्यास करणाऱ्या तालुक्यातील तज्ञ मंडळींना एकत्रित आणण्याचे काम केले. सन २०१६ साली तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांनी नेमलेल्या जुन्नर तालुका अभ्यास समितीचे नेतृत्व करत तत्कालीन पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्यासोबत तालुका पर्यटन व्हावा याविषयी चर्चा व सादरीकरण केले. व लगेचच त्या कार्याला यश येत जुन्नर तालुका राज्यातील पहिला तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाला. त्याच वर्षी म्हणजे २०१६ ला तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व छत्रपती संभाजीराजे शिवनेरी किल्ल्याची पाहणी करण्याकरता आले असता त्यांना किल्ला समजून सांगण्याचे भाग्य सरांना लाभले. त्याचबरोबर सन २०२० मधे महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोशियारी यांच्यासमवेत शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचे व किल्ल्याविषयी माहिती सांगण्याचे भाग्य देखील सरांना प्राप्त झाले.किल्ले शिवनेरीचे दुर्ग वाचन घेऊन महाराष्ट्रातील अनेक युवक युवतींना किल्ले संवर्धनाकडे वळवण्यात सर यशस्वी झाले आहेत. कल्याण, डोंबिवली, मुंबई, नाशिक, धुळे इत्यादी ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर सरांच्या मार्गदर्शनाखाली दुर्ग संवर्धनाची कामे सुरू आहेत. याचबरोबर किल्ले संवर्धन कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील विविध महाविद्यालये विद्यालये येथे अनेक व्याख्याने सुद्धा दिली आहेत. सन २०१६ साली किल्ले हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या सतरा पर्यटकांची सुटका करण्यामध्ये सुद्धा रेस्क्यू टीम चा सर एक घटक होते. याअगोदर सन २००२ मध्ये किल्ले जीवधनवर अडकलेल्या पाच उत्साही पर्यटकांची सुटका करण्यासाठी मदत व त्याचबरोबर जुन्नर दरवाजा मध्ये अडकलेले तरुण महाविद्यालयीन युवक युवती यांना सरांकडे उपलब्ध असलेल्या दोरीच्या साहाय्याने सुखरूप गडाखाली आणण्यात ते यशस्वी झाले.

क्रीडा शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत असताना अनेक तालुका जिल्हास्तरावर व काही राज्यस्तरावरील खेळाडू घडवले.२०१३ साली बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धांच्या आयोजनामध्ये सक्रिय सहभागाची सुद्धा संधी सरांना मिळाली. सध्या जुन्नर तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन या इंग्रजी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेली दोन वर्षांपासून सेवा करण्याची संधी शिक्षकांनी दिली आहे. त्याचबरोबर अनेक नृत्य स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून ही भूमिका पार पाडलेली आहे.जुन्नर येथे नगर वाचनालयाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धामध्ये सुध्दा मुख्य परीक्षकाची भूमिका बजावण्याचा मान सरांना मिळाला आहे.
एक सेवाभावी शिक्षक व दुर्ग संवर्धक म्हणून आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन पंचायत समिती, जुन्नर तालुक्यातील काही सेवाभावी संस्था, धुळे,भोर येथील शिवभक्त यांनी अनेक पुरस्काराने सन्मानित केले हे आनंदाचे क्षण आहेच पण शिवकार्य व विद्यार्थी संस्कार सातत्यानं करत रहाणे याचा आनंद या पुरस्कारांपेक्षाही खूप मोठा आहे असे सर नेहमी सांगतात. यांचे वडील वडील कै लक्ष्मण केशव खोत हे नेहमी अभिमानाने म्हणत असत की, माझी दोन्ही मुले (विनायक व रामेश्वर) मी देवाला अर्पण केली आहेत पैकी विनायक हा छत्रपती शिवरायांचं कार्य करत आहे व रामेश्वर हा ब्रह्मचारी राहून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय च्या माध्यमातून आध्यात्मिक व सामाजिक सेवा करत आहे. वडिलांनी उद्गारलेल्या या वाक्यांपेक्षा अधिक कौतुकाचे शब्द काय असू शकतील. तसेच प्रा विनायक खोत आवर्जून सांगतात.

प्रा. विनायक खोत

नाव – प्रा. विनायक लक्ष्मण खोत
पत्ता – मु. सद्भावना भवन, परदेशपुरा , पो. – जुन्नर ,तालुका- जुन्नर , जिल्हा- पुणे
जन्म दिनांक  -२८/०२/१९६७
सेवा क्षेत्र- न्यू इंग्लिश स्कूल खामगाव ,तालुका जुन्नर .

भूषवलेली पदे :
१) श्री शिवाईदेवी यात्रा कमिटी, जुन्नर, (अध्यक्ष २०१२ व संस्थापक सदस्य )
२)जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना ,उपाध्यक्ष  (१९९५)
३)जुन्नर तालुका फुटबॉल असोसिएशन ,उपाध्यक्ष  
४) शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्था, महाराष्ट्र (विश्वस्त  )
५) जुन्नर तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशन (अध्यक्ष)
६) शिवकालीन मर्दानी युद्धकला (प्रशिक्षक  )


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *