दुर्गसंवर्धक प्रा. विनायक खोत यांना शिवनेरी भूषण पुरस्कार तर ज्येष्ठ समाजसेवक कै. डॉ. अनिल अवचट यांना मरणोत्तर ‘ छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार ‘ जाहीर

पवन गाडेकर
निवासी संपादक
१५ फेब्रुवारी २०२२

जुन्नर


राज्य तसेच देश – विदेशातून जे पर्यटक जुन्नर तालुक्यातील गड किल्यांच्या अभ्यासासाठी येतात पर्यटनासाठी येतात त्यांना जुन्नर तालुक्यातील पर्यटनाची आणि ऐतिहासिक गडकिल्यांची माहिती देण्याचे विशेष कार्य प्रा. विनायक खोत यांनी केले त्याबद्दल त्यांना ‘ शिवनेरी भूषण पुरस्कार ‘ जाहीर झाला आहे. तसेच जुन्नर तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक कै. डॉ. अनिल अवचट यांना ‘ मरणोत्तर छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार ‘ जाहीर झाला आहे. डॉ. अवचट यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. जुन्नर तालुक्याच्या या दोनही सुपुत्रांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी पुरस्कारासाठी शिफारस केली. राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा मानाचा ‘ शिवनेरी भूषण पुरस्कार ‘ येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजंतीदिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देऊन सन्मानित केले जाणार आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

दुर्गसंवर्धक प्रा. विनायक खोत यांचे शिवकार्य अनेकांना प्रेरणा देणारे

प्रा. विनायक खोत
प्रा. विनायक खोत

एका ध्येयाने प्रेरित झालेले व्यक्तिमत्व म्हणून जुन्नर तालुका इंग्रजी अध्यापक संघाचे अध्यक्ष, शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्थेचे विश्वस्त, दुर्ग संवर्धक, इतिहास संशोधक प्रा. विनायक खोत हे मागील २२ वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील किल्ले संवर्धन व किल्ल्याचे जतन करणे तसेच आपला शिक्षकी पेशा जपत इतिहासाचा अभ्यास करून माझं गाव, माझी शिवजन्मभूमी सर्वांना ज्ञात व्हावी या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन माझा राजा हा तमाम जनतेला माहीत व्हावा. त्यांचे कार्य, त्यांचा आदर्श हा सर्वांनी आचरणात आणावा यासाठी प्रा. खोत हे प्रयत्नशील आहेत. देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना तालुक्यातील गड किल्ले केवळ पाहण्यासाठी नाही तर त्यांचे वाचन करता यावे यासाठी ते मार्गदर्शन करत असतात. आजपर्यंत अनेकांसाठी किल्ले शिवनेरीचे दुर्ग वाचन केले. ” आपण करत असलेले कार्य हे शिवरायांचा एक मावळा म्हणून करत आहोत ” अशी त्यांची भावना असल्याने ते आपले हे कार्य शिवकार्य समजून या कार्यासाठी एक रुपयाही स्वीकारत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास असल्याने प्रा. विनायक खोत यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून दुर्ग संवर्धनाचे कार्य अविरत सुरू आहे. तसेच त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जुन्नरी कट्टा आता चांगलाच प्रकाशात येऊ लागला आहे. तालुक्याचा इतिहास जगासमोर येण्यासाठी केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरतोय. दुर्गसंवर्धन का आणि कसे करावे यासाठी मोफत कार्यशाळा आयोजित करून महाराष्ट्रभर दौरे केले. गेली १५ वर्ष शिवाजी ट्रेल च्या माध्यमातून खोत सर दुर्ग संवर्धनाचा प्रचार करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासनाने यंदाचा मानाचा ‘ शिवनेरी भूषण ‘ हा पुरस्कार घोषित केला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने प्रा. खोत यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

व्यसनमुक्तीसाठी आयुष्य खर्ची करणारे कै. डॉ. अनिल अवचट

डॉ. अनिल अवचट

मराठी साहित्यामध्ये कै. डॉ. अनिल अवचट यांनी मोलाचे योगदान दिले आहे. ते जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील असून दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिकातील वेध या सदरातून त्यांनी केले. साधना व पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादनही त्यांनी केले. युक्रांदला अर्पण केलेले पूर्णिया हे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रकाशित झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षीचा २०२१ ‘ मसाप जीवनगौरव पुरस्कार ‘ त्यांना देण्यात आला होता. त्यांच्या लिखाणात कायम त्यांचं संवेदनशील मत, अभ्यासक आणि संशोधक वृत्ती दिसून आली. डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची फार मोठी हानी झाली. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना २६ जून २०१३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या साहित्य, समाजसेवा आणि व्यसनमुक्तीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यावर्षीचा शासनाचा मरणोत्तर ‘ छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार ‘ जाहीर झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *