किराणा दुकानात वाईन, तर मग शेतकऱ्यांना गांजा लागवडीलाही परवानगी द्या : मनसे

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
११ फेब्रुवारी २०२२

शिरूर


शासनाने नुकताच एक निर्णय घेत, वाईन विक्रीसाठी सुपर मार्केटला परवानगी दिलेली आहे. या निर्णयाचा खरपूस समाचार विविध ठिकाणी विविध पक्ष, संघटना व त्यांच्या नेत्यांनी घेतलाय. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुका मनसेने ही, शिरूर तहसील कार्यालयास एक निवेदन दिलेय. त्यात त्यांनी शासनावर उपरोधिक टीका केलेली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, निवडणुका आल्यानंतर जाहीरनामे जाहीर होतात, शेतकऱ्यांना वीज माफी देऊ, कर्जमाफी देऊ, हमीभाव देऊ, पण प्रत्यक्षात मात्र सरकार आल्यावर जाहिरनाम्याचा विसर पडतो. तसेच आता नवीनच शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला न्याय व चालना मिळावी म्हणून वाईनची विक्री किराणा मालाच्या दुकानातून करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. जर आपणास व आपल्या यंत्रणेला शेतकरी कर्जमुक्त व्हावा असे वाटत असल्यास, आपण शेतमालाला हमीभाव देण्याबाबत पाऊले उचलली जात नाहीत. वीज बील भरले नाही म्हणून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जातात. या सर्व अडचणीतून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी उपाययोजना नाही आणि काही ठराविक भांडवलदारांसाठी वाईन विक्री किराणा माल दुकानातून, मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा विषय वाऱ्यावर, अशाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का…? अशाप्रकारे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील हे आपल्या सरकार मधील मत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला १० गुंठे गांजा लागवडीसाठी परवानगी आणि गावठी दारूला… देशी दारूची मान्यता देण्यात यावी.

अशाप्रकारे वरील आशयाचे निवेदन, हे शिरूर – हवेली तालुका मनसे प्रमुख तेजस यादव यांच्या पुढाकाराने शासनास देण्यात आलेय.या निवेदनावर उपजिल्हाध्यक्ष किरण गव्हाणे, जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे, शिरूर शहराध्यक्ष अविनाश घोगरे, शिरूर तालुका उपाध्यक्ष रवी गुळादे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, महिला तालुकाध्यक्ष वैशाली साखरे, महिला शहराध्यक्ष शारदा भुजबळ, रस्ते आस्थापना तालुकाध्यक्ष सुदाम चव्हाण आदी मनसे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *