विजयमाला कदम व आमदार रोहित पवार यांना रमाई रत्न पुरस्कार प्रदान

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी,ओझर
०९ फेब्रुवारी २०२२

पुणे


आज विभक्त कुटुंब पद्धती आपण स्वीकारली असली तरी कुटुंब व्यवस्था आजही भारतात टिकून आहे. त्या कुटुंब व्यवस्थेचा स्त्री हा कणा असून त्या कुटुंब व्यवस्थेचे अस्तित्व आबाधीत राखण्यात प्रत्येक कुटुंबाचा त्याग, समर्पण आणि बलिदान दडलेले आहे. त्या अर्थाने भारतीय कुटुंब व्यवस्थेतील प्रत्येक स्त्रीमध्ये रमामाईचा अंश आहे, असे मत ज्येष्ठ लेखक आणि आगामी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. महामाता रमामाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने यंदाचा रमाई रत्न पुरस्कार २०२२ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयमाला पतंगराव कदम व आमदार रोहित पवार यांना आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजीत अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह भारतीय संविधानाची प्रत तिरंगी शाल व बोधिवृक्ष असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी व्यासपीठावर रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, कुणाल राजगुरू, प्रेरणा गायकवाड, बौद्ध धर्माचे अभ्यासक झेन मास्टर सुदस्सन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा विद्याताई कदम, कार्याध्यक्ष फरझाना इकबाल,  आदी मान्यवर उपस्थित होते.


वाडिया कॉलेज समोरील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित या महोत्सवाचा आज समारोप झाला. यावेळी बोलताना भारत सासणे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व घडण्यामागे रमामाई आंबेडकरांचे समर्पित आयुष्य उभे राहिले होत. बाबासाहेबांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या तळागाळातील वंचित, दुर्बल आणि पिडीतांना जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा, जगण्याचे ध्येय प्राप्त करून द्यावे,यासाठी कार्य उभे रहावे, अशी रमामाईंची इच्छा होती. त्या इच्छेपोटी त्यांनी त्यागाची परिसीमा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. दरम्यानच्या काळात कुटुंबावर झालेले आघात बाबासाहेबांपर्यंत पोहोचू न देता रमामाईंनी एकटीने सोसले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातूनच रंजल्या गांजलेल्यांना आत्मभान आणि अस्तित्व मिळाले. संविधानाची चर्चा घरोघरी झाली पाहिजे. संविधानाची स्वीकृती हा स्वत्वाचा आणि स्वातंत्र्याचा उदघोष होता. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, जीतपातीचे राजकारण सोडून विकासाचे समाजकारण करणे आवश्यक आहे.

विकासाचा वेग वाढवायचा असेल, तर जातीपातीच्या शृंखला गळून पडल्या पाहिजे. थोरामोठ्यांच्या केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून भागणार नसून त्यांनी सांगितलेले विचार आत्मसात करून त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले पाहिजे.यावेळी बोलताना विजयमाला पतंगराव कदम म्हणाल्या की,शारीरिकदृष्ट्या आम्ही ज्येष्ठ या वर्गवारीत मोडत असलो तरी सामाजिक कर्तव्यातून आम्ही मुक्त झाललो नाही. समाज उत्थानाचा आणि समाजाप्रती असलेल्या आमच्या दायित्वाचा वसा स्व.पतंगरावांनी संपूर्ण कदम कुटुंबियांना दिलेला आहे. तो वसा आम्ही निष्ठेने जोपासू. आज मिळालेला पुरस्कार आम्हाला उभारी आणि प्रेरणा देणारा असून कर्तव्याचीकरून देणारा आहे. यावेळी सचिन ईटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.प्रमोद आडकर यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. लता राजगुरू यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *