वाघोली-शिरूर दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ फेब्रुवारी २०२२

पुणे


वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप (STUP) कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. या रस्त्याच्या कामासाठी अनेकदा घोषणाही झाल्या. परंतु त्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा न झाल्याने हा प्रश्न भिजत पडला होता. मात्र सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून खासदार डॉ. कोल्हे यांनी चिकाटीने पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलांसह एकूण १८ पदरी रस्त्याच्या सुमारे रु. ७२०० कोटींच्या कामाला मंजुरी दिली होती. तसेच या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यानुसार कन्सल्टंन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून स्तुप कन्सल्टंन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कन्सल्टंन्सी आठवडाभरात प्रत्यक्ष पाहणी करणार असून सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना केंद्रीयमंत्री गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकार्य करीत हा प्रकल्पाला पाठबळ दिले असून गतवर्षी या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे सादरीकरण झाले होते.

या संदर्भात खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, वाघोली ते शिरूर रस्त्यासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त झाल्याने वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. या दोन्ही नेत्यांचे मी शिरूरच्या जनतेच्यावतीने आभार व्यक्त करतो. या पुढील काळात या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *