राज्याच्या सागरी किनाऱ्यांवरील सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०९ फेब्रुवारी २०२२

मुंबई


राज्याच्या सागरी किनाऱ्यांवरील सुरक्षेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. राज्याची सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या सुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सागरी सुरक्षा दलाचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

राज्याची सागरी सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सागरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या किनारपट्टीची सुरक्षितता अधिक भक्कम करण्यासाठी, सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने संवेदनशील व महत्त्वाच्या प्रस्तावांना शासनस्तरावरून तात्काळ मान्यता देण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचे आयोजन

राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना एकूण ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय व्यवस्था कार्यरत असून त्याची माहिती गृहमंत्र्यांनी घेतली. किनाऱ्यांच्या ठिकाणी अत्यावश्यक व आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देत सागरी सुरक्षा दलातील तांत्रिक रिक्त पदे भरण्याकरता शासन मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी किनारपट्टीची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या सहा अत्याधुनिक बोटी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याबाबत विहित मर्यादा निश्चित करण्यास गृहमंत्र्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *