शिरूर शहरातील डॉक्टरचे अपहरण नंतर सुटका; शहरवासीय धास्तावले : एक अपहरणकर्ता अटक

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
८ फेब्रुवारी २०२२

शिरूर


शिरूर शहरातील एका नामांकित डॉक्टरला पैशांसाठी अपहरण केल्याची घटना घडली असल्याने एकाच खळबळ उडाली होती. परंतु या अपहरण नाट्यावर चोवीस तासांत पडदा पडला असून, पोलिसांनी या अपहरण करणाऱ्यांपैकी काहींना ताब्यात घेतले आहे. परंतु शिरुर शहरातील या पहिल्याच घटनेने, सर्व शहरवासीय सावध झाले आहेत. या प्रकरणी डॉ. संदीप तुळशीराम परदेशी (वय 59, रा. यशोदीप, मारुती आळी, शिरूर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी कुणाल सुभाषसिंग परदेशी (रा. शिरूर) यास अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. याप्रकरणी कुणाल सुभाषसिंग परदेशी याच्यासह अन्य सात जणांविरुद्ध फिर्याद देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी, रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास यातील काही आरोपींनी डॉ संदीप परदेशी यांना फोन केला आणि आजीच्या आजारपणाचा बहाणा करून, डॉ. परदेशी यांना बोलावून घेतले. त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या मारुती 800 (नंबर नसलेली गाडी) मध्ये बसविले व त्यांचे अपहरण केले. डॉ परदेशी यांना अपहरणाची चाहूल लागताच, त्यांनी सुटकेसाठी प्रयत्न केला. मात्र अपहरणकर्त्यांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून शांत बसण्यास सांगितले. त्यांना कर्डे (ता. शिरूर) येथील घाटात नेउन मारहाण केली व बांधुन ठेवले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यासाठी पैशांची मागणी केली.

आपला जीव महत्वाचा असल्याने, डॉ. परदेशी यांनी आपल्या वाहन चालकाला फोन केला व त्याला पैसे घेऊन येण्यास सांगितले. या चालकास अपहरणकर्त्यांनी पुणे अहमदनगर जिल्हा सरहद्दीवर असणाऱ्या व घोडनदीवरील सतरा कमानी पुलाजवळ रक्कम आणून देण्यास सांगितले. त्याठिकाणी रक्कम दिल्यानंतर डॉ. परदेशी यांना सोडुन देण्यात आले. मात्र त्याआधी खंडणी वसुलीसाठी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या खिशातील रोख रुपये १५ हजार, तसेच गाडीच्या चाव्या व अन्य साहित्य काढून घेतले होते. या प्रकरणी, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक किरण उंदरे हे पुढील अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *