रमेश देव म्हणजे चिरतरुण, सदाबहार व्यक्तिमत्व, काळाच्या पडद्याआड

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०३ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना भेटण्याचा चार वेळा योग आला होता…

प्रथम प्रसंग होता गलगले निघाले या केदार शिंदे दिग्दर्शित सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी.. या सिनेमाचे चित्रीकरण पिंपरी चिंचवड मध्येच झाले होते. केदार शिंदे यांना या सिनेमासाठी दिशा सोशल फाऊंडेशन ची मोलाची मदत झाली होती. जेष्ठ नाट्य कलाकार भरत जाधव यांची मुख्य भूमिका असल्येला या सिनेमात रमेश देव यांचीही महत्वाची भूमिका होती. शूटिंग दरम्यान रमेश देव यांचे सीन झालेवर आम्ही सेटवर गप्पा मारत असे. एव्हडे मोठे हिंदी मराठी इंडस्ट्री गाजवलेले कलाकार असूनही कुठेही ” ग “ची बाधा आढळली नाही हे विशेष. अगदी सर्वसामान्य वेक्ती प्रमाणे गप्पा मारत असे. त्यावेळी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यांचे वय एव्हडे झाले होते आणि ते स्वतःला एव्हडे तंदुरुस्त कसे ठेवत होते याचे रहस्य तेव्हा उमगले. ते म्हणजे त्यांचा आहार अतिशय शिस्तबद्ध होता. एकदम मोजके आणि पौष्टिक पण साधे जेवण ते घेत असे. जेवणात एक चपाती , कमी तेल असलेली भाजी , अगदी अत्यल्प डाळ भात आणि जेवणानंतर एक सफरचंद. एव्हडे मोजके जेवण ते करत असे. विशेष म्हणजे सेटवर इतर कलाकारांना जे जेवण असे तेच जेवण ते करत असे. त्यांनी केव्हाही हॉटेलमधून वेगळे जेवण मागवले नाही. त्यांचे भाषेवर अतिशय प्रभुत्व होते. त्यांच्यातला विशेष गुण म्हणजे एव्हडे महान कलाकार असूनही त्यांच्यात अहंकार आणि मोठेपणाचा लवलेशही नव्हता. त्यांना गप्पा मारायला खुप आवडे. त्यांनी आमच्याबरोबरही अगदी जुनी ओळख नसतानाही गप्पा मारताना अनेक हिंदी, मराठी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झालेले किस्से त्यांनी ऐकवले होते. त्याच सिनेमात कै. शाहीर विठ्ठल उमाप यांचीही भूमिका होती. त्यामुळे या दोन जेष्ठ कलाकारांसोबत गप्पा मारण्याचा संवाद साधण्याचा मस्त योग आला होता. तेव्हा जी ओळख झाली ती ओळख अगदी काल परवा पर्यंत त्यांनी जपली होती. कारण मी त्यांना नेहमी फोन करत होतो. ते नेहमी म्हणायचे अरे या रे इकडे मुंबईला खूप गप्पा मारू आपण. अरे एव्हडे मोठे घर पण गप्पा मारायला कोण्ही नसते रे. मुंबईत अगदी समुद्रकिनारी त्यांचा भला मोठा फ्लॅट आहे. कित्येगदा बोलावले पण जाण्याचा योग आला नाही ही खंत जरूर आहे.

दुसऱ्यांदा भेट

दुसऱ्यांदा भेट झाली ती महानगरपालिकेत. त्यांचा एक ऐतिहासिक वासुदेव बळवंत फडके हा सिनेमा येणार होता त्यासाठी पालिकेकडून त्यांना 25 लाख रु ची मदत होणार होती. तेव्हा शहराचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी त्यांना मदत केली होती. गलगले निघाले सिनेमानंतर कित्येक दिवसाने आम्ही भेटत होतो. तेव्हा भेटलो तेव्हा विचारले सर ओळखले ? तर म्हणाले हो मग तुम्हांला कसे विसरणार तुम्ही गलगले निघाले सिनेमच्यावेळी आपण खुप धम्माल केलीं होती. मोठी माणसे उगाच मोठी नसतात याचा प्रत्येय तेव्हा आला. तेव्हा आम्ही चिंचवड येथील मयुर थाळी मध्ये त्यांचा पाहुणचार केला होता. ते नेहमी जेव्हा जेव्हा भेटले त्यांनी हॉटेल मयुरची आठवण काढली.

 

तिसऱ्यांदा भेट

तिसऱ्यांदा भेट झाली ती जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुलें मामा त्यांच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण यांच्या वतीने कै अंकुशराव लांडगे नाट्यगृहात जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांना मानाचा समजला जाणारा यशवंत वेणू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा पुन्हा एकदा त्यांची ग्रेट भेट झाली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर खुप छान गप्पा झाल्या होत्या.

 

चौथ्यांदा ग्रेट भेट

माजी खासदार सुरेश कलमाडी आणि डॉ जब्बार पटेल यांनी इंटरनॅशनल पुणे फिल्म फेस्टिवल सुरू केला. त्यामध्ये सिनेमा साठी ग्रेट योगदान असणाऱ्या विविध क्षेत्रातील म्हणजेच दिग्दर्शन, संगीत,आणि अभिनय क्षेत्रातील दिग्गज वेक्तींचा सत्कार या व्यासपीठावर केला जातो. आणि हा सोहळा पुणे मध्ये गणेश कला क्रीडा मंडळ, सिटी प्राईड कोथरूड या ठिकाणी घेतला जातो. सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी अधिकारी प्रवीण तुपे यांच्या माध्यमातून हा फेस्टिवल पिंपरी चिंचवड मध्ये व्हावा अशी ईच्छा डॉ जब्बार पटेल यामच्याकडे केली आणि ती मान्य करून पुणे प्रमाणेच आपल्या शहरातही हा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू केला. तेव्हा एक वर्धि ला रमेश देव यांचे वय 91 असताना हा लाईफ टाईम आचिव्ह अवॉर्ड रमेश देव सीमा देव यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी रमेश देव आणि सीमा देव यांना माझी ओळख असल्याने रिसिव्ह करण्याची जबाबदारी तुपे सरांनी माझेवर दिली होती. त्यावेळी त्या सन्मान सोहळ्यात पालिकेचे अधिकारी सतीश इंगळे यांचा आर्केस्ट्रा होता त्यामध्ये रमेश देव सीमा देव यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यावर वय वर्षे 91 असणाऱ्या रमेश देव यांनी ठेका धरला व व्यासपीठावर येऊन महादेव यांनी त्या वयातील सदाबहार डान्स केला आणि प्रेक्षकांची मने जिंकली सोळा झाल्यावर ती फिल्म फेस्टिवल सिनेमे दाखवण्यात येत होते तो सिनेमा पाहण्यासाठी ते स्क्रीन समोर बसले. तब्बल एक ते दीड तास त्यांनी त्या जुन्या जमान्यातील सिनेमाचा मनमुराद आनंद घेतला. सीमा ताई ना लवकर मुंबई ला जायचे असल्याने मला म्हणाले की मला गाडीपर्यंत सोडा, त्यावेळी मी त्या दोघांनाही गाडी पर्यंत सोडायला गेलो तेव्हाही जाताना आमच्या छान गप्पा झाल्या तीच माझी त्यांच्याबरोबरची शेवटची भेट ठरली. ते मला खूपदा मुंबईला घरी ये असे म्हणाले होते पण जाता आले नाही ही खंत आहे. त्यानंतर बऱ्याचदा फोनवर संभाषण होत असे, त्यांची विचारपूस नेहमी करत असे. मात्र रात्री त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समजल्यावर मन वेथित झाले. अशा या सदाबहार अभिनयातील राजाला आपला आवाज आपली सखी टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.


 

One thought on “रमेश देव म्हणजे चिरतरुण, सदाबहार व्यक्तिमत्व, काळाच्या पडद्याआड

  • February 3, 2022 at 7:17 pm
    Permalink

    भावपुर्ण श्रध्दांजली.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *