अभाविप ने काढली जुन्नरमध्ये भव्य तिरंगा पदयात्रा

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२६ जानेवारी २०२२

जुन्नर


संपूर्ण भारत वर्षात विद्यार्थ्यांची सर्वात मोठी समजली जाणारी विद्यार्थी संघटना म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जुन्नर शहरामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जुन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य शंभर फुटी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. असा दावा संयोजकांच्या वतीने करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. तेथून नवीन बस स्टॅन्ड, कृषी बाजार समिती, धान्य बाजार, नेहरू बाजार, सदा बाजार या मार्गाने ही पदयात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत जुन्नर शहरामध्ये विद्यार्थी कार्यकर्त्यांनी तिरंगा धरून या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला. ‘गाव गाव मे जायेंगे, भारत नया बनायेंगे’ या घोषणेने जुन्नर शहर दुमदुमून गेले. या तिरंगा पदयात्रेमध्ये फुलांचा वर्षाव करून स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वागत करत आपला सहभाग नोंदवला.

जुन्नरच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य शंभर फुटी तिरंगा पदयात्रा : संयोजकांचा दावा

पदयात्रेचा समारोप जुन्नर नगर परिषद येथे झाला. पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत यांनी ‘स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष’ हा विषय मांडला. भारताचे हे अमृत महोत्सवी वर्ष जरी असले तरी भारत हा काय ७५ वर्षांचा नाही तर भारत हा अनादि अनंत काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप या सर्व शूरवीरांचे स्मरण व जयघोष यावेळी करण्यात आला.

भारताने जगाला आयुर्वेद दिला, योग दिला, शून्य दिला असा आपला जाज्वल्य इतिहास, ज्ञानाची शौर्याची व त्यागाची वैभवशाली परंपरा व संताची मांदियाळी असलेल्या या सर्वांकडून विश्वाला मार्गदर्शन करण्याची भावना व ताकद भारत देशामध्ये असल्याचे पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी अभाविप पुणे विभाग संघटन मंत्री रोहित राऊत, जिल्हाप्रमुख प्रा. मनोहर चव्हाण, उत्तर पुणे जिल्हा संयोजक गणेश पाडेकर, प्रदेश कार्यकरिणी सदस्य प्रसाद आठवले, शहरमंत्री प्रणिती भवाळकर, अभाविप पूर्व कार्यकर्ते नगरसेवक नंदू तांबोळी, हरीश भवाळकर, सचिन कालेकर, अरुण कबाडी, अंकुश पानसरे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

गाव गाव मे जायेंगे, भारत नया बनायेंगे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *