“ऑनलाईन डेटा” वापरामुळे शासकीय कामकाज, लोककल्याणकारी योजना राबविणे सहज शक्य – महापौर उषा ऊर्फ माई ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ जानेवारी २०२२

पिंपरी-चिंचवड


सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ‘डेटा’ हा खूप महत्त्वाचा आहे. शासकीय कामकाज आणि लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी “ऑनलाईन डेटा”चा उपयोग होतो. ओपन डेटा हा कोणत्याही कायदेशीर किंवा आर्थिक बंधनांशिवाय सर्वांना डाऊनलोड करणे, अद्ययावत करणे आणि वितरण करणे यासाठी उपलब्ध असतो. नागरिकांपासून उद्योजकांपर्यत संशोधक आणि व्यवसायांपर्यंत, कोणीही कोणत्याही कारणास्तव याचा वापर करु शकतो. या माध्यमातून नागरिक प्रशासन किंवा महानगरपालिकेला आपले अभिप्राय देखील देवू शकतात. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी याचा वापर होवू शकतो, असे मत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्मार्ट सिटी लि. व पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड इंटरप्राईज विभागाच्या वतीने दि.१७ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या पीसीएमसी ओपन डेटा सप्ताहाचा आज समारोप कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, सहा.पोलीस आयुक्त श्रीकांत डिस्ले, पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड इंटरप्राईज सेंटरच्या डायरेक्टर डॉ. अपुर्वा पालकर, माहिती तंत्रज्ञान अध‍िकारी अनिता कोटलवार, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार आदी उपस्थ‍ित होते. तत्पूर्वी, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर, देशात सर्वप्रथम ओपन डेटासाठी तयार केलेल्या “पीसीएमसी ओपन डेटा डॅशबोर्ड” चे महापौरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पीसीएमसी ओपन डेटा सप्ताहाचा उत्साहात समारोप

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, ओपन डेटा सर्वांना नि:शुल्क उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडून ‘ओपन डेटा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ओपन डेटा याचा अर्थ इंटरनेटवर सर्वांसाठी सहज, सुलभ आणि मुक्तपणे उपलब्ध असलेली माहिती असा होतो. आपले पिंपरी चिंचवड शहर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख शहर आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने माहिती तंत्रज्ञानाविषयी विविध उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. केंद्र शासनाच्या वतीने ‘ओपन डेटा वीक’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये, पिंपरी चिंचवड शहरातील ४०० हून अध‍िक स्पर्धकांनी डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग, डेटा हॅकेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून नागरिकांमध्ये ओपन डेटा संदर्भात जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. या ओपन डेटा उपक्रमाचा मुख्य उद्देश स्मार्ट सिटी ओपन डेटा पोर्टलला समृद्ध करणे असा असून ज्या शहराची स्मार्ट सिटी म्हणून निवड झाली आहे, त्यांच्यामार्फत दर्जेदार डेटासेट, डेटास्टोरी, ब्लॉग अपलोड केले आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटी लि.च्या मदतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अन्य विभागांनी स्मार्ट सिटीज ओपन डेटा पोर्टलवर डेटासेट अपलोड केले आहेत, ज्याचा शासकीय- निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक किंवा संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, किंवा महाविद्यालये, शहरातील नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार याचा वापर करण्यास मदत होणार आहे. हा ओपन डेटा कोणीही ऍक्सेस करु शकतो, वापरु शकतो आणि शेअर देखील करु शकतो, असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

सहा.पोलीस आयुक्त श्रीकांत डिस्ले म्हणाले की, डेटा सायन्सने विकसित केलेल्या पोलिस इंटरव्हेंशन सिस्टीम, पोलिस विभागांना प्रशिक्षण, समुपदेशन आणि सिनीलर संसाधने प्रदान करण्यासाठी प्रतिकूल घटना घडण्याची शक्यता ओळखून प्रतिकूल घटनांचा मागोवा ठेवणे शक्य झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी, बळाचा वापर, अपघात किंवा दुखापतीच्या स्वरूपातील घडणा-या घटना यावर नियंत्रण आणण्यासाठी याचा उपयोग केला जात असून पोलीस विभागाच्या डेटामध्ये प्रतिकूल घटनांचा अंदाज लावण्यासाठी अशा प्रणालीचा वापर केला जात आहे. डेटा अॅनालिटिक्ससह वाहतूक समस्या आणि अकार्यक्षमता दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी च्यावतीने इंटीग्रेशन कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून शहरातील सीसीटीव्हीद्वारे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार असून यामध्ये डेटा खूप महत्वाची भुमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, “क्रिएटींग डेटाईझन्स इन्व्होल्वींग पीपल फॉर प्रॉब्लेम सोल्व्हींग” या विषयावर झालेल्या चर्चा सत्रात आयुक्त राजेश पाटील, सहा.पोलीस आयुक्त श्रीकांत डिस्ले, सोशल इनोव्हेशन हॅकवॅरेट इस्राईल सेंटरचे कार्यकारी संचालक झोहार शरोन, सॅपीओ ऍ़नॅलिटीक्सचे सीईओ अश्वीन श्रीवास्तव, अल्गो ऍ़नॅलिटीक्सचे सीईओ अनिरुध्द पंत, रुबीक्सेप गृपचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. प्रशांत पानसरे, डॉ. अपुर्वा पालकर यांनी सहभाग घेवून ओपन डेटा संदर्भात चर्चा केली. ओपन डेटा संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘पीसीएमसी ओपन डेटा चॅलेंज’ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरामध्ये ई-गव्हर्नंसला चालना मिळणार आहे.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *