सावधान : मास्क लावा, नाहीतर दंड भरा : पोलिसांची कारवाई सुरू

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
११ जानेवारी २०२२

शिरूर


सध्या पुन्हा एकदा कोरोनाने शीघ्रतेने डोके वर काढायला सुरुवात केलीय. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नव्याने कडक निर्बंध लागू केलेत. अलीकडच्या काही महिन्यांत लसीकरण बऱ्यापैकी झाल्याने, जणू कोरोना रोग गेला की काय ? अशा अविर्भावात सर्वजण वागत होते. त्यातच सर्व नियम शिथिल झाले होते, त्यामुळे अनेकांनी मोठे समारंभ भरविल्याचे सर्वत्रच चित्र पाहायला मिळाले. परंतु डिसेंबर व जानेवारी महिन्यात, कोरोना व त्याचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन चे हजारो रुग्ण जलद गतीने वाढल्याने, पुन्हा एकदा भारत सरकार व महाराष्ट्र सरकार पुढे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लावून अनेक नियम व अटी लागू केलेले आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या सूचनेनुसार, शिरूर शहरात विनामास्क फिरणाऱ्या व शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केलीय.

शिरूर शहरात सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी, एस कॉर्नर येथे पोलीस निरीक्षक विक्रम जाधव यांच्या नेतृत्वाखाली कारवाया करण्यात आल्या. यात पंधरा जणांवर विनामास्क फिरत असल्याने, प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड ठोठावून, त्यांच्याकडून साडेसात हजार रुपये दंडाची रक्कम हस्तगत करण्यात आलीय. विशेष म्हणजे यातील अनेकांजवळ मास्क होते, पण ते खिशात ठेवलेले होते. या कारवाई दरम्यान कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम शिंदे हे देखील आपल्या मोटार सायकलवरून विनामास्क चाललेले होते. त्यामुळे त्यांच्यावरही पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव यांनी कारवाई करत, येथून जवळच असलेल्या मेडिकल मधून स्वतः काही मास्क विकत आणले व कारवाई केलेल्या सर्वांना मास्क वाटून, ते तोंडावर व नाकावर लावण्यास भाग पाडले. उत्तम शिंदे यांनीही दिलगिरी व्यक्त करत, शिरूर पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीचे कौतुक करत, सर्वांनाच मास्क लावण्याचे आवाहन केले.

या पथकात गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण वाडेकर, सागर गुणवरे, प्रकाश झेंडे, वीरेंद्र सुंबे, प्रवीण पिठले, शंकर चव्हाण, भागवत गरकळ यांचा समावेश होता.अशाप्रकारची अनेक पथके, ही शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये कारवाया करणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितलेय. त्यामुळे सर्व नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी, तसेच स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *