अत्याचार पिढितेला न्याय मिळवून देण्यासाठी ‘शक्ती’ कायदा महत्वाचा : मा. निलम गोरे

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
७ जानेवारी २०२२

ओझर


वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कायदा, पोलिस, सामाजिक संघटना व सर्व राजकीय पक्षांशी संवाद करून शक्ती विधेयक एकमतानं पारीत केलं. अत्याचार पिढीत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती कायदा महत्वाचा असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी केले. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित परिसंवादात त्या अध्यक्ष म्हणून ‘शक्ती कायदा व महिला अत्याचार निवारण’ या विषयावर बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महिला अत्याचार निवारण हा फक्त कायद्यानं सोडवायचा विषय नाही, तसेच सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकूनही चालणार नाही, समाजातील सर्व घटकांनी महिला अत्याचार निवारणावर बोललं पाहिजे, कृती केली पाहिजे. बलात्कारीत महिला मूलीनं तक्रार करणं ते तीला न्याय मिळण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना महिलांना करावा लागतो. त्या अडचणी पोलीस, वकील, कुटुंबिय, डॅाक्टर इत्यादींशी संबंधित आहेत, त्यावर या कायद्यात मार्ग काढायचा प्रामाणिक प्रयत्न सरकारचा आहे. तसेच बदलत्या काळानूसार सोशल मिडिया व इतर इलेक्ट्रॉनिकी माध्यमांतील महिलांची बदनामी, छळ आता या शक्ती कायद्याच्या मदतीने गुन्हा ठरणार असून, अँसिड हल्ला, बलात्कारीत महिला यांचं संपूर्ण पुनर्वसनही आता कायद्यानं सरकारी यंत्रणा वा त्यांच्या सहयोगी संस्थांची जबाबदारी ठरणार आहे.

या परिसंवादातील वक्त्या, विधिज्ञ रमा सरोदे यांनी शक्ती कायद्यातील‌ कांही तरतुदींमध्ये दूरूस्ती होण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन केले. लोकसंख्येनुसार पोलिसांची संख्या वाढवणे, न्यायालय व न्यायाधिशांची संख्या वाढवणेही कायदा कडक करण्याइतकेच गरजेचे आहे असे सांगून बलात्काराच्या घटनेच्या तपासाचा विशिष्ट कालावधी नेमून देण्याच्या तरतूदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. खोटी तक्रार करणाऱ्या महिलेलवर गून्हा दाखल करण्याच्या तरतूदीचाही प्रत्यक्ष बलात्कारपिढीत महिले विरोधातच वापर होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व सरचिटणीस अतुल लोंढे यांनी खोट्या तक्रारी करण्याला आळा घालण्याची गरज प्रतिपादन करून कठोर कायदा, परिणामकारक अंमलबजावणी आणि प्रबोधन या मार्गानीच महिला अत्याचारांच्या घटना रोखता येतील असे सांगून महिला अत्याचार रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिसंवादाचे आयोजक युवक काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले. सूत्रसंचालन जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयचे युवराज गटकळ यांनी केले. तर आभार युवक काँग्रेस सरचिटणीस प्रथमेश आबणावे यांनी मानले. यावेळी शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते व स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *