रामदास सांगळे
विभागीय संपादक
२४ डिसेंबर २०२१
बेल्हे
बेल्हे (ता.जुन्नर) येथील डॉ. क्षमा संजय शेलार यांनी लिहीलेल्या ‘दशोराज्ञ’ कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी सुमारे १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास जगासमोर मांडल्याने त्यांच्या या कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.क्षमा संजय शेलार यांच्या दशोराज्ञ या ‘संवेदना प्रकाशन’, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पहिल्याच कादंबरीस, मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथील, ‘शब्दकळा साहित्य संघ’ या गेले २१ वर्षापासून साहित्याशी बांधिलकी असणा-या संस्थेचा सन् २०२०-२१ चा राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. मान्यवर अतिथींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण येत्या ९ जानेवारीला होणार आहे.
या कादंबरीस सुप्रसिद्ध लेखक, नाटककार,अभिनेता व निर्माता असणाऱ्या दिग्गज अशोक समेळ यांची प्रस्तावना लाभलेली आहे. सदर कादंबरीचे प्रकाशन ३१ जानेवारी २०२१ ला ज्येष्ठ लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते नाशिक येथे संपन्न झाले होते. ताम्रयुग आणि लोहयुगाच्या सांधी काळातील भरत कुळातील राजा सुधास आणि इतर दहा राजे यांच्यात झालेल्या दाशरोज्ञ युद्धाचे संगोपन करणारी ही कादंबरी आहे. या कादंबरीसाठी त्यांना विलास गोवर्धने, प्रतिभा गोवर्धन, डॉ संजय शेलार, विक्रम भागवत, डॉ.स्वप्नील नाडे, इतिहास तज्ज्ञ निरंजन कुलकर्णी, वृषाली शिंदे व नितीनजी हिरवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.