श्री क्षेत्र कोरठण खंडोबा येथे ९ डिसेंबरला चंपाषष्ठी महोत्सव

रामदास सांगळे
विभागीय संपादक
३ डिसेंबर २०२१

बेल्हे


महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे गुरुवार (दि.९) डिसेंबरला चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षी भाविकांची दर्शनास गर्दी होईल, असा अंदाज असून देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ यांनी जोरदार तयारी केली आहे. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह किर्तन, प्रवचन आदी सोहळे साजरे होणार असून परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा सुवर्ण कलशारोहन १९९७ साली चंपाषष्टीला करण्यात आला. तेव्हापासून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. हे २४ वे वर्ष असून श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या मुर्ती मंदिराचा सहावा वर्धापन दिन व प.पू.गगनगिरी महाराजांच्या मूर्ती ध्यानमंदिराचा पाचवा वर्धापन दिनही या महोत्सवात साजरा होणार आहे.

पहाटे श्रींच्या मूर्तीस मंगलस्नान, उत्सव मूर्तीची साज शृंगारासह सिंहासनावर अनावरण पुजा व आरती झाल्यानंतर सकाळी ६ वाजता अभिषेक पुजा व सकाळी ७ ते ९ होमहवन सकाळी ८ ते १० आनंद यात्री भक्ती संगीत आळेफाटा यांचे सुश्राव्य भजन, गोरेगाव ग्रामस्थांचा दिंडी सोहळा, ११ वाजता महाप्रसाद, सकाळी ११ ते १ हभप गजानन महाराज काळे यांचे किर्तन होणार आहे.दुपारी दानशूर देणगीदारांचा नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते सन्मान होऊन पालखीचे मंदिर प्रदक्षिणा करून व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे. तसेच वाहनतळ, पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था आदींचे देवस्थान ट्रस्टने नियोजन केले आहे. असे देवस्थानच्या वतीने कळवण्यात आले असून करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *