जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले यांना “साहित्यिक कार्यकर्ता” पुरस्काराने सन्मानित

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० नोव्हेंबर २०२१

पिंपरी


महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने ११४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून लेखक आणि कवींच्या साहित्याचा गौरव पुण्यातील एस एम जोशी सभागृहात करण्यात आला. महाराष्ट्रातील नामवंत लेखकांच्या पुस्तकांना पारितोषिक देण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ९४ शाखेतील सदस्यांमधून सर्वोत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्याना या वर्षी ‘साहित्यिक कार्यकर्ता पुरस्कार’ देण्यात आले.

महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांना हा पहिला पुरस्कार देण्यात आला. जेष्ठ साहित्यिक सदाफुले गेली ४० वर्ष साहित्य सेवा करीत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेच्या माध्यमातून त्यांनी गदिमा कविता महोत्सव, शिवार साहित्य संमेलन, ग्रामजागर साहित्य संमेलन असे नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम पिंपरी चिंचवड शहरात आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात सातत्याने राबविले. याची दखल घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुरुषोत्तम सदाफुले यांना ‘साहित्यिक कार्यकर्ता’ म्हणून गौरविण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार , कार्यवाह प्रकाश पायगुडे, साहित्यिक न. म. जोशी,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कवी उद्धव कानडे, कार्यवाह माधव राजगुरू, दीपक करंदीकर उपस्थित होते.

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले- महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते मिळाला आहे. त्यामुळे गेली वीस वर्ष कोणताच पुरस्कार स्वीकारला नव्हता. परंतु साहित्य संस्थांची शिरोमणी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेने दिलेल्या पुरस्काराचे विशेष महत्व आहे. आयुष्यभर साहित्यसेवा करण्याचे बळ हा पुरस्कार मला देत राहील.अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *