पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाईपदाच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी
२९ नोव्हेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांच्या भरतीसाठी नुकतीच लेखी परीक्षा झाली होती. १९ नोव्हेंबरला पारपडलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. १०० गुणांच्या या लेखी परीक्षेत २ उमेदवारांना सर्वाधिक ९८ गुण मिळाले आहेत. तर सहा उमेदवारांना चक्क शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या दरम्यान सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळं निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या केंद्रवर पोचता आले नव्हते. तर परीक्षेला एक लाख ७ हजार १२४ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या ७२० जागांसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख ८९ हजार ७३२ अर्ज आले होते. या लेखी परीक्षेसाठी राज्यभरातील युवकांनी अर्ज केले होते. लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये, यासाठी परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले होते.

परीक्षेत आढळला होता ब्लूटूथ कॉपीचा प्रकार

लेखी परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून नये. कॉपी तसेच डमी परीक्षार्थी, असे प्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे व्हिडिओ शुटिंग करण्यात आले होते. चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र इतक्या सगळया गोष्टी करूनही पिंपरीतील परीक्षा केंद्रावर हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला होता. यात लेखी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवाराने तोंडाला लावायच्या मास्कमध्ये मोबाईल सदृश्य प्रकार तयार केला होता. ब्लू टूथच्या आधारे त्या मोबाईला लिंक करून परीक्षा देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र उमेदवाराच्या वर्तनाचा संशय आल्याने पोलिसांनी चाणाक्षपणा दाखवत त्याची तपासणी केली. त्यामध्ये ही चोरी उघड झाली होती. मात्र आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसका देत तेथून पळ काढला होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *