राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार खांदेपालट, दिग्गजांनी लावली फिल्डिंग

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या काही महिन्यांवर निवडणूक होणार आहे. अगदी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये अध्यक्षांची खांदेपालट होणार आहे. त्यामुळे कोण असतील पुढील कारभारी याकडे कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांचेही डोळे लागले आहेत. शराध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवणार की राष्ट्रवादी चे अध्यक्ष खासदार शरद पवार ठरवणार हे लवकरच समजेल. खरे तर पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला होता. तो हातातून गेल्याचे शल्य अजित पवार यांना नक्कीच आहे. पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी नव्या दमाच्या कोणत्या कारभाऱ्याकडे सूत्रे सोपवणार हे पाहायला मिळणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष बदलाच्या हालचालीमुळे कार्यकर्त्यांमध्येही हालचल झाली आहे. वाघेरे गटाकडून नाराजीचे सूर पाहायला मिळतात. तर एक गट अध्यक्ष बदलाच्या बाजूने आहे. खरे तर संजोग वाघेरे पाटील यांनी अतिशय वाईट काळात अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. मितभाषी आणि सर्वांना सांभाळून व बरोबर घेऊन जाण्याची त्यांची कार्यपद्धत होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात मोठे वाद उफाळले नाही ही त्यांची जमेची बाजू आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांची फळी बांधली होती ते कार्यकर्ते नाराज झाले आहेत. वाघेरे यांच्याशी संपर्क साधला असता अध्यक्ष बदलाविषयी विचारले असता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जसा आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही तो पाळणार असल्याचे सांगितले. आम्हांला पक्षाने भरभरून दिले असून ते जो निर्णय घेतील तो आम्हांला मान्य असेल.

खांदेपालट होत असताना शहराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने माजी स्थायी समिती अध्यक्ष विद्यमान नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते त्यांच्या बरोबरच राजकीय खेळीचे पितामह भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे तर हल्ली सत्ताधाऱ्यावर तुटून पडणारे व त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आरोप करणारे माजी महापौर योगेश बहल यांचेही नावाची चर्चा आहे. तर महिला अध्यक्षपदासाठी नेहमी सर्वसाधारण सभेत आवाज उठवणाऱ्या माजी महापौर डॉ वैशाली घोडेकर यांच्या बरोबर माजी महापौर अपर्णा डोके व कविता आल्हाट यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. युवक अध्यक्षपदासाठी ज्यांनी या शहराची सूत्रे काही काळ आपल्या हाती ठेवली होती ते माजी महापौर आझम पानसरे यांची घरवापसी झाली आहे त्यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. आता पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आजच निर्णय जाहीर करतात की चर्चा करून निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *