कल्याण महामार्गावर इनोव्हा व उसाच्या ट्रॅक्टर चा भीषण अपघात : एक ठार, दोन जखमी

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२० नोव्हेंबर २०२१

नगर


नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवार (दि.१९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा व ट्रॅक्टरचा अपघात होऊन इनोव्हा गाडीतील एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता.जुन्नर) शिवारातून क्रांती शुगर फॅक्टरीकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर (एम.एच १६ केव्ही ६४८६) विना नंबरच्या दोन ट्रॉली घेऊन जात होता. त्याच दरम्यान रस्त्यावरून जाणारी इनोव्हा मोटार (एम.एच.१९- ए.पी ८०१०) ट्रॉलीला पाठीमागून जाऊन धडकली. जोरदार धडक बसल्याने मोटारीचा चक्काचूर झाला.

गाडीतील संजय मारुती गगे (वय:-५० रा. नळावणे,ता.जुन्नर,जि.पुणे) असे अपघातात ठार झाले असून योगेश धोंडिबा आहेर, संदीप पोपट शिंदे (दोघेही रा. नळवणे, ता.जुन्नर) असे गंभीर जखमी झालेल्‍यांची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की मोटारीमधील संजय मारुती गगे जागीच ठार झाले. उर्वरित दोन जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले करण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी इनोव्हा चालक राहुल भास्कर हाडवळे यांच्या विरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरच्या विना नंबर डबल ट्रॉलीला मागे रिफलेक्टर नसल्याने चालकाला अंदाज न आल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *