विशेष ग्रामसभा घेण्याच्या शासकीय आदेशाला केराची टोपली

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१८ नोव्हेंबर २०२१

बेल्हे


मंगळवार (दि.१६) रोजी विशेष ग्रामसभा घेण्याच्या उपविभागीय अधिकारी जुन्नर, आंबेगाव, मंचर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पेमदरा (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीने गावात ग्रामसभा घेतली नाही. ग्रामस्थ सावकार बेलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामसेवक गावात आले नाही, तसेच ग्रामसभेबाबत दिवसभर कोणतीही हालचाल झाली नाही. आम्ही आमची कामे घेऊन गेलो असता ग्रामपंचायतीत ग्रामसभा नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आम्हाला समस्या मांडण्या पासून वंचित राहावे लागले.

या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करणे, सातबारा वाचन करणे,पाणंद रस्त्याची मागणी,वाळू लिलाव खाणपट्टे नूतनीकरण, करोमुळे मृत पावलेल्या पालकांची नावे वाचन करून निराधार योजनेचा निराधारांना फायदा देता येतो का याची तपासणी आदी विषयांवर विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. या ग्रामसभेसाठी ग्रामसेवक गावात हजर नव्हते. ग्रामसभा न होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत ग्रामसेवक मोहन गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. ही विशेष ग्रामसभा केव्हा होते याकडे आता ग्रामस्थांच लक्ष लागल आहे.
————-
प्रतिक्रिया : “१६ नोव्हेंबर ची विशेष ग्रामसभा ज्या ग्रामपंचायतीने घेतली नाही त्यांना पुढील ५ ते ६ दिवसात ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” शरदचंद्र माळी बीडीओ,जुन्नर.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *