शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी मी सकारात्मक – राजेश पाटील आयुक्त

रोहित खर्गे
विभागीय संपादक
९ नोव्हेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड


पिंपरी चिंचवड शहर सांस्कृतिकदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी आवश्यक ते सर्व बदल करण्यासाठी मी तयार आहे. शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी धोरण करावे यासाठी सकारात्मक आहे असे मत आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले. थिएटर वर्कशॉप कंपनीच्या पैस रंगमंच येथे रंगयात्री महोत्सवात झालेल्या साहित्यिक कलावंतांच्या चर्चासत्रात त्यांनी हे मत व्यक्त केले. चिंचवडच्या पैस रंगमंच येथे २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या १५ दिवसांच्या कालावधीत विविध कलांचा समावेश असलेला रंगयात्री महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड येथील कलाकारांना निशुल्क व्यासपीठ देत त्यांनी कला सादर करण्याची संधी देण्यात आली. याद्वारे ३९ संस्था आणि २५० कलाकारांनी आपली कला सादर केली. महोत्सवाच्या शेवटच्या थिएटर वर्कशॉप कंपनी संस्थेच्या ‘प्रारंगण’ (प्रायोगिक रंगांगण) या उपक्रमाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

शेवटच्या दिवशी ५ नोव्हेंबर रोजी करोना आणि त्यानंतरची कलाकारांची स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी कलाकार आणि साहित्यिकांचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, सुनील लांडगे, गोविंद वाकडे, अभिनेते ड़ॉ. संजीवकुमार पाटील, नाट्यकलाकार नरेंद्र आमले, ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस, श्रीकांत चौगुले, नाना शिवले, राजन लाखे आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला. प्रभाकर पवार यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. यावेळी बोलताना आयुक्त पाटील म्हणाले की, सध्यस्थितीत करोनानंतरच्या काळात कलाकारांच्या परिस्थितीचा विचार केला असता कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवूया. यासाठी कलाकारांचे संघटन करुन धोरणात्मक निर्णयही घेऊ असे आश्वासन आयुक्तांनी कलाकारांना दिले. भाऊसाहेब भोईर म्हणाले की, गेल्या २५ वर्षांत शहरातील कलाकार आणि साहित्यिकांना एकत्रित करुन घडवलेले हे चर्चासत्र स्तुत्य आहे असे म्हणत महोत्सवाचे यातून फलित मिळेल असे समाधान व्यक्त केले. यामुळे कलाकारांना असलेल्या अडचणींवर तोडगा काढता येईल.

शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी मी सकारात्मक – राजेश पाटील आयुक्त

डॉ. संजीवकुमार पाटील- महापालिकेने नाट्यकलाकारांसाठी वेगळे बजेट ठेवायला हवे. तसेच राजकीय कार्यक्रमांमुळे ब-याचदा ठरलेले सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केला जातात. परंतू नाट्यगृहांमध्ये नाटकाला प्राधान्य द्यायला हवे असे ते म्हणाले.
अविनाश चिलेकर- सांस्कृतिक धोरणामध्ये बदल करुन सर्वंकष कलांचा समावेश व्हायला हवा असे म्हणाले. तसेच सध्या वृत्तपत्रांमधील बातम्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, वृत्तपत्रांचे भवितव्य कठिण बनले असल्याने जाहिरातींवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अनेकदा पेड बातम्यांवर भर द्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी मांडली.

सुनिल लांडगे- शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहरात कला फुलवण्यासाठी कलाकारांनी मेहनत घेतली असून हा वारसा पुढे नेण्यासाठी कलाकारांना राजाश्रय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गोविंद वाकडे – शहराची सांस्कृतिक भूक भागवली जात नसल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे आकडेवारी सांगते आहे. त्यामुळे शहरात होत असलेल्या कलांना प्रोत्साहन आणि कलाकारांना राजाश्रय आवश्यक आहे.

श्रीकांत चौगुले- शहरातील संस्था आणि कलाकार जगवण्यासाठी संस्थांना मानधन देणे आवश्यक आहे. तसेच काही कला दुर्लक्षित राहिल्या असून महापालिकेने त्याकडे लक्ष देत त्यांना प्रोत्साहन द्यावे असे मत व्यक्त केले.

सुहास जोशी व सहकाऱ्यांनी महोत्सवात शेवटच्या दिवशी चर्चासत्रानंतर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे वाघाची गोष्ट हे नाटक सादर झाले. महोत्सवाचे नियोजन थिएटर वर्कशॉप कंपनी संस्थेचे ऋतुजा दिवेकर, साक्षी धादमे, पवन परब, बाळकृष्ण पवार, संगिता हळनोर, कोमल काळे, रश्मी  घाटपांडे, बाळ सावंत, मनोहर जुवाटकर, युसुफ शेख, अक्षय यादव, सचिन बहिरगोंडे, अनिकेत गोगावले, संकेत गोगावले यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *