पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या सन्मानाने ‘दिवाळी माध्यान्ह’ साजरी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत शब्दधन काव्यमंचाने ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्या हस्ते सन्मान करून ‘दिवाळी माध्यान्ह’ या आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचेही औचित्य साधले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, समीक्षक प्रदीप गांधलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपले आयुष्य समाजातील भटक्या विमुक्त मुलांसाठी समर्पित करीत असल्याने चिंचवडगावातील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् हेच आता खऱ्या अर्थाने प्रभुणे यांचे घर झाले असल्याने आपल्या साहित्यिक परिवारासह तेथे जाऊन शब्दधनने सन्मानचिन्ह, मदतनिधीचा धनादेश, शाल, श्रीफळ प्रदान करून हा हृद्य सन्मान केला. त्यावेळी “त्याग, सेवा, स्वावलंबन म्हणजे गिरीश प्रभुणे होय!” असे गौरवोद्गार काढीत श्रीकांत चौगुले यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा विस्तृत आढावा घेतला; तर प्रदीप गांधलीकर यांनी गिरीश प्रभुणे यांच्या ‘पालावरचं जिणं’ , ‘पारधी’ , ‘लोक आणि संस्कृती’ या साहित्यकृतींचे रसग्रहण केले. ‘गल्लोगल्ली समाजसेवक बोकाळले असताना प्रभुणेकाका म्हणजे कृतिशील समाजसुधारक आहेत!” असे विचार पुरुषोत्तम सदाफुले यांनी व्यक्त केले. शिवाजीराव शिर्के यांनी शुभेच्छापर आणि राधाबाई वाघमारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले की, “लौकिक यश न मिळालेल्या एका माणसाचा हा सत्कार आहे, असे मी मानतो. पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची जातीवादामुळे अधोगती झाली आहे. जाती-जातींमध्ये तीव्र द्वेषभावना आहे. शाळेच्या दाखल्यावर अजूनही जात लिहावी लागते. कौशल्याधारित शिक्षणाच्या अभावामुळे समाजाला दैन्यावस्था प्राप्त झाली आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र उभा करायचा असेल तर साहित्यिकांना समाजाला जोडण्याचे काम करावे लागेल. त्यासाठी समाजाशी नाळ जोडली तरच प्रतिभासंपन्न अन् वास्तववादी साहित्यनिर्मिती होईल!”

या प्रसंगी नितीन हिरवे, नंदकुमार मुरडे, वर्षा बालगोपाल, आय. के. शेख, सुहास घुमरे, कैलास भैरट, रघुनाथ पाटील, आत्माराम हारे, अशोक गोरे, एकनाथ उगले, मनोज मोरे या साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसह पिंपरीगाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची उपस्थिती होती.

जयश्री गुमास्ते, ॲड. अंतरा देशपांडे, तानाजी एकोंडे, मुरलीधर दळवी, शरद काणेकर, फुलवती जगताप यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू…” या मंत्राचे सामुदायिक उच्चारण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी स्वागतगीत म्हटले. शब्दधन काव्यमंचाचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले आणि निशिकांत गुमास्ते यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *