पिंपरी-चिंचवडमधील स्वस्त धान्य दुकानातून दर्जेदार धान्य पुरवठा करा – आमदार महेश लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२७ ऑक्टोबर २०२१

पिंपरी-चिंचवड


अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने देशातील व राज्यातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्यपुरवठा करण्यात येत आहे. मात्र सध्या ऐन सणासुदीच्या काळात रेशन दुकानांवर मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या धान्याचा दर्जा सुधारावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यासाठी आपण गांभीर्याने दखल घ्यावी,अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना स्वस्त धान्य दुकानांमधून केवळ गहू आणि तांदूळ वाटप केले जात आहे. परंतु या दोन्ही धान्याचा दर्जा निकृष्ट असल्याने नागरिकांना मिळालेले धान्य खावे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.गव्हामध्ये आळ्या व किडे झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गहू टरफले शिल्लक राहिल्यासारखे झाले आहे. तर तांदळामध्ये कणी जास्त असून त्यामध्ये देखील सोनकिडे व जाळ्या आळ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये असे निकृष्ट अन्नधान्य नागरिकांनी कसे खावे? असा प्रश्न आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

शिवाय प्रतिव्यक्ती मिळणारे धान्य देखील रेशन दुकानदार अपुरे देत आहे.शासनाकडूनच कमी प्रमाणात धान्यपुरवठा होत आहे. अजून दोन ते तीन महिने अशीच स्थिती राहील, असे रेशन दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. घरातील कामे बहुतांश गृहिणींना करावी लागत आहेत. स्वस्त धान्य दुकानावरील धान्य खरेदी करणारे नागरिक सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना दररोज कामाला गेले तर घरातील चूल पेटत आहे. अशा परिस्थितीमध्ये रेशन दुकानावरील धान्य व्यवस्थित करण्यातच त्यांचा अधिक वेळ जात आहे. शिवाय धान्य व्यवस्थित नसल्याने खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे महिलावर्गात नाराजी आहे. राज्य शासनाने चांगल्या धान्याचा पुरवठा करावा. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावत, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *