कामांची वाटचाल मंदगतीने; आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती आणि कानउघाडणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ ऑक्टोबर २०२१

पिंपरी-चिंचवड


चिंचवड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांची आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. २५) महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. अनेक ठिकाणी संथगतीने कामे सुरू असल्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. कामांना गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करा. विशेषतः खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात ही बैठक झाली. महापौर माई ढोरे व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे सर्व नगरसेवक तसेच महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील यांच्यासह स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता या बैठकीला उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

महापालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक कामे सुरू आहेत. रस्ते, जलनिस्सारण, ग्रेडसेपरेटर यांसह अनेक मोठी कामे सुरू आहेत. मात्र ही कामे संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागातील सर्व अभियंत्यांची नगरसेवकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आमदार जगताप यांनी मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या कामाचा आढावा घेतला. प्रत्येक कामनिहाय संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कामे संथ गतीने का सुरू आहेत?, कामांना निधी कमी पडतोय की तुम्ही कर्तव्य बजावण्यात कमी पडताय?, याची अधिकाऱ्यांना विचारणा केली. उत्तरे देता देता अधिकाऱ्यांची बोबडी वळली.कामांच्या गतीबाबत अधिकाऱ्यांकडून कोणतेच समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. असा संथ कारभार खपवून घेणार नसल्याचा इशारा देत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. सर्व कामांना तातडीने गती द्या, खोदकाम केलेल्या रस्त्यांची कामे सर्वात आधी पूर्ण करा, नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळेल असे काम करा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *