शहरातील वैदयकीय सुविधा सुधारुन ‘मिनी वायसीएम’ उभारणार – आयुक्त राजेश पाटील

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२२ ऑक्टोबर

पिंपरी


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा कारभार व तेथील कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न सुरू केले जात आहे.

शहरातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी शहरात अजूनही छोटे मोठे दवाखाने व ‘मिनी वायसीयम’ सुरू करण्याचा मानस आहे. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी कायमस्वरूपी २०० डॉक्टर्स ची भरती करणार असल्याचेही सांगितले. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचवण्यासाठी जे नवीन भाग समाविष्ट झाले आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे दवाखाने उभारून आरोग्यसेवा पुरवली जाईल. दिल्ली येथील मोहल्ला क्लिनिक धर्तीवर छोटा दवाखाना सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामुळे जागेवरच नागरिकांना आरोग्य सेवा घेता येईल. छोटे छोटे दवाखाने उभारल्याने वायसीएम वरील ताण कमी होईल.

महापालिकेच्या वतीने आकुर्डी , भोसरी, थेरगाव, व जिजामाता रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये १ डिसेंबर पासून प्रसूती विभाग सुरू केला जाणार आहे. त्यामुळेही वायसीएम वरील बराच ताण कमी होणार आहे. सद्यःस्थितीत वायसीएम मध्ये दरदिवशी ३० हुन अधिक प्रसूती होत आहेत. या चार रुग्णालयांमध्ये प्रसूती विभाग सुरू झालेवर त्या भागातील महिलांना वायसीएम ला यावे लागणार नाही. त्याचप्रमाणे कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय करणार नसल्याचेही सांगितले.

दर्जेदार वैदयकीय सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका स्तरावर अभ्यास करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंदीगढ येथील पदव्युत्तर संस्थेमध्ये महापालिका अधिकाऱ्यांचा दौरा केला जाणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *